यवतमाळ : डोलामाईट खाणीच्या डोह सदृश्य खड्ड्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन अल्पवयीन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. अथक शोध मोहिमेनंतर आज रविवारी सकाळी तीनही तरुणांचे मृतदेह खाणीच्या खड्ड्यातून काढण्यात आले. ही घटना वणी तालुक्यातील वांजरी (खदान) गावालगत असलेल्या डोलामाईट खाण परिसरात घडली.

आसिफ शेख (१६) ,नुमान शेख (१५) व प्रतीक संजय मडावी (१६) रा. एकता नगर वणी अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेही शनिवारी दुपारपासून बेपत्ता होते. कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता, वांजरी गावालगत असलेल्या डोलोमाईट खाणीच्या खड्ड्यालगत तिघांचेही कपडे, चपला, दुचाकी, मोबाईल आदी साहित्य आढळून आले. त्यामुळे तिघेही खाणीतील खड्ड्याच्या पाण्यात बुडाल्याची शक्यता व्यक्त होत होती.

हेही वाचा >>>‘परीक्षांचे निकाल लावा, नाहीतर…’; विद्यार्थ्यांचा एमपीएससीला निर्वाणीचा इशारा

घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र अंधार झाल्याने शोधमोहीम राबविता आली नाही. रविवारी सकाळीच एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने खड्ड्यात मृतदेहांचा शोध सुरू केला. अखेर सकाळी ८ वाजताच्या सुमारास तीनही तरुणांचे मृतदेह हाती लागले.हे तिघेही नेहमीच वांजरी (खदान) येथे पोहण्यासाठी येत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. तीनही तरुणांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. पुढील तपास वणी पोलीस जमादार प्रभाकर कांबळे व अमोल नुनेलवार करीत आहे.