यवतमाळ : शेतीचे वाद मिटविण्यासाठी राज्य शासनाचे ‘सलोखा’ अभियान सुरू असताना जिल्ह्यात शेतीच्या वादातून हाणामाऱ्या आणि खुनाचे प्रकार घडण्याच्या घटनांत अचानक वाढ झाली आहे. शेतीच्या वादातून तीन खून झाल्याने जिल्हा हादरला. यातील दोन घटना आर्णी तालुक्यात तर तिसरी उमरखेड तालुक्यात घडली.

आर्णी तालुक्यातील ब्राह्मणवाडा तांडा येथे दारूड्या भावाने लहान भावाला कुऱ्हाडीचे घाव घालून ठार केले. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. विजय शेषराव पवार (३८, रा. ब्राह्मणवाडा तांडा) असे मृताचे नाव आहे. तर संजय शेषराव पवार (४२, रा. ब्राह्मणवाडा) असे आरोपी भावाचे नाव आहे.

हेही वाचा – चंद्रपूर : दोन बछडे असलेली ताडोबाची ‘छोटी राणी’ जखमी

दुसरी घटना उमरखेड तालुक्यातील अमडापूर येथे बसस्थानक परिसरात घडली. प्रकाश परसराम राठोड (३०, रा. चिल्ली ई., ता. महागाव) असे मृताचे नाव आहे. आरोपी कुंडलिक जांबवंत राठोड (२५, रा. भाजूनगर तांडा, ता. उमरखेड) याने प्रकाशच्या पोटात चाकूने वार करून त्याचा खून केला. काही वर्षांपासून प्रकाश व कुंडलिकमध्ये शेतीचा वाद सुरू होता. रविवारी प्रकाश ५, ६ जणांना घेऊन कुंडलिकडे शेतीचा ताबा सोडून दे असे सांगायला गेला. तेथे त्यांच्यात वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. तेव्हा कुंडलिकने धारदार चाकू प्रकाशच्या पोटात खुपसला. प्रकाशला उपचारासाठी उमरखेड येथे नेत असताना त्याचा मृत्यू झाला. दराटी पोलिसांनी या प्रकरणी आरोपी कुंडलिक राठोड यास ताब्यात घेतले.

दरम्यान, आर्णी तालुक्यातील आयता येथे दोन गटांत मंदिराच्या शेतीच्या वादातून हाणामारी झाली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या योगेश जोगमोडे (३०) या युवकाचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान राजकीय वर्चस्वाच्या वादातून आपल्या मुलाचा बळी गेल्याचा आरोप योगेशचे वडील अशोक जोगमोडे यांनी रविवारी पत्रकार परिषदेतून केला. त्यांच्या तक्रारीवरून आतापर्यंत ११ आरोपींना पारवा पोलिसांनी अटक केली आहे. राजू पंजवाणी (रा. आयता), सचिन राठोड, नितेश चव्हाण (दोघेही रा. अंतरगाव) यांना यापूर्वीच अटक करण्यात येऊन न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींपैकी सहाजणांना न्यायालयीन कोठडी, तर पाचजणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

हेही वाचा – अमरावती : लग्नाचे आमिष देत पोलीस कर्मचाऱ्याद्वारे तरुणीचे लैंगिक शोषण

शासनाने वहीवाटीचे वाद सोडविण्यासाठी ‘सलोखा’ अभियान सुरू केले आहे. सामंजस्याने शेतीचे वाद सोडविण्यासाठी महसूल प्रशासन प्रयत्नात असताना यवतमाळ जिल्ह्यात वाद वाढले आहेत. उन्हाळ्यात शेतीच्या मशागतीची कामे सुरू होत असल्याने शेतीचा ताबा घेण्यावरून हे वाद वाढल्याचे चित्र आहे. दरम्यान जिल्ह्यात गेल्या साडेतीन महिन्यांत खुनाच्या २४ घटना घडल्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कोलमडल्याचे चित्र आहे.

पतीचा मृत्यू, पत्नीस मुलगा झाला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हल्या्यत गंभीर जखमी योगेशचा शनिवारी मृत्यू झाला. त्याच्यावर सायंकाळी पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. योगेशची पत्नी नऊ महिन्यांची गर्भवती होती. रविवारी सकाळी योगेशच्या पत्नीस प्रसवकळा सुरू झाल्या. तिला तातडीने यवतमाळ येथे एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथे तिने एका बाळाला जन्म दिला.