वाशीम : शहरात दोन दिवसांत तीन पिस्तुल जप्त करण्यात आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. पाच युवकांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. युवकांचा गुन्हेगारी क्षेत्राकडे वाढता कल चिंतेचा विषय बनला आहे. शहरी भागासह गावागावात अवैध धंदे सुरू असून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.
वाशीम शहरातील वृंदावन पार्क येथे तीन युवकांकडून एक पिस्तुल व धारधार शस्त्र जप्त करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी गजबजलेल्या रविवार बाजार परिसरात विनोद भोयर व अनिल भोयर रा. वांगी, ता. वाशीम यांच्याकडून दोन पिस्तुल, तेरा जिवंत काडतुसे व एक धारदार शस्त्र आढळून आल्याने खळबळ उडाली.
हेही वाचा – यवतमाळ: शिफारशीपेक्षा हमीभाव अडीच हजार रुपये कमी ! शेतकऱ्यांनी ग्रामसभा घेऊन कापूस जाळला
हा प्रकार काही सुज्ञ नागरिकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. त्यांच्याकडे ही शस्त्रे आलीच कशी? शहरात शस्त्र विक्री करणारी टोळी आहे का? त्यांचा काय उद्देश होता? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. अनेक ठिकाणी अवैध व्यवसाय सुरू असून अनेक युवकांचा गुन्हेगारी क्षेत्राकडे वाढता कल चिंतेचा विषय बनला आहे. याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज असून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस विभागानेदेखील कठोर पावले उचलण्याची मागणी केली जात आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांना संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.