गडचिरोली : शहरापासून सात किलोमीटर अंतरावरील काटली गावाजवळ पहाटे फिरायला गेलेल्या ६ शालेय मुलांना अज्ञात ट्रकने धडक दिली. या भीषण अपघातात चार मुलांचा मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. टिंकू नामदेव भोयर (१४), तन्मय बालाजी मानकर (१६), दुषण दुर्योधन मेश्राम (१४), तुषार राजेंद्र मारभते(१४) सर्व राहणार काटली अशी मृतांची नावे आहे. धडक दिल्यानंतर अंधाराचा फायदा घेत ट्रक चालक पसार झाला.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सहाही मुले नेहमीप्रमाणे पहाटे फिरायला गेले होते. गडचिरोली-आरमोरी मार्गांवरील काटली गावापासून एक किमी अंतरावर असलेल्या नाल्याजवळील मार्गावर ही मुले बसली होती. दरम्यान ५ वाजून १० मिनिटाच्या सुमारास एका भरधाव अवजड वाहनाने सहाही मुलांना उडविले. यात टिंकू आणि तन्मय या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर उपचारादरम्यान दुषणची प्राणज्योत मालवली. अपघातात जखमी क्षितिज तुळशीदास मेश्राम, आदित्य धनंजय कोहपरे या दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे.

दोघांची प्रकृती नाजूक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अपघातानंतर घटनास्थळावर काही काळ तणावाचे वातावरण होते. दरम्यान, भरधाव अवजड वाहतुकीवर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्राथमिक तपास सुरु केला आहे. प्रकाश कमी असल्याने आसपासच्या लोकांना ट्रक क्रमांक नोंदविता आला नाही. अपघाताची माहिती मिळताच गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी घटनास्थळी जात प्रत्यक्षदर्शींचे बयान देखील घेतले आहे. त्यामुळे लवकरच धडक देणाऱ्या वाहनाची ओळख पटविण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

भरधाव अवजड वाहतुकीविरोधात रोष

गेल्या तीन वर्षात गडचिरोली जिल्ह्यात उद्योग धंद्यांसोबत अपघाताच्या प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे. आष्टी ते आरमोरी मार्गावर लोहखनिज, रेती वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परवर कुणाचेही नियंत्रण नसल्याने अपघात रोखण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. या अपघातानंतर गावातील लोकांनी अवजड वाहणांच्या अनियंत्रित वाहतुकीवर रोष व्यक्त केला आहे.