भंडारा : कोथुर्णा जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या खैरी बे. शेत शिवारातील शेतकऱ्यांना शेती सिंचीत करता यावी यासाठी बसविण्यात आलेले तीन विद्युत रोहित्र तब्बल पंधरा दिवसांपासून बंद आहेत. पंधरा दिवसांपूर्वी हे तिन्ही रोहित्र जळाले होते. याबाबत तक्रार केली असतानाही महावितरणचे कोणतेही कर्मचारी आणि अधिकारी न आल्याने आणि रोहित्र दुरुस्ती न केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आणि संताप आहे.

भंडाऱ्यापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या खैरी बे. गावातील सुमारे ७०० कृषीपंप धारकांसाठी पाच डीपी शेत शिवारात लावण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आणि सिंचनासाठी मदत व्हावी याकरिता हे बसवण्यात आले आहे. ट्रान्सफॉर्मरला आग लागण्याच्या घटना वारंवार होत असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले, दरम्यान पंधरा दिवसांपूर्वी या शेतशिवारातील तीन विद्युत रोहित्र जळून राख झाले. महिना भरापूर्वीच एका डीपीवर नवीन ट्रान्सफॉर्मर लावण्यात आला होता. त्यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत सुरू होता.

मात्र पुन्हा ज्या नवीन ट्रान्सफर समोर आणखीन दोन ट्रान्सफॉर्मरने चक्क पेट घेतल्याने आगिच्या लोळात हे रोहित्र वेढल्या गेले होते. स्थानिक नागरिकांनी वीज वितरण कंपनी प्रशासनाला सदर जळीत रोहित्र प्रकरणाची माहिती दिली मात्र महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी पंधरा दिवस लोटूनही दुरुस्तीसाठी आले नाही असे लीलाधर ईश्वरकर यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

भारतीय जनता पक्ष भंडारा ग्रामीण आयटियल सेलचे प्रमुख लिलाधर ईश्वरकर यांनी सांगितले की, विद्युत रोहित्रमध्ये बिघाड होत असल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहे. याबाबत तक्रार केल्यास महावितरणचे कर्मचारी उडवा उडवीची उत्तर देतात. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मुबलक पाणी असताना सुद्धा महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे वेळेवर नवीन विद्युत रोहित न बसवल्यामुळे शेतीला पाणी पुरवठा करण्यास अडचणी येत असल्याचे ईश्वरकर यांनी सांगितले.

सध्या परिसरात धान आणि मिरचीची लागवड सुरू आहे. शेतकरी सिंचनासाठी धावपळ करीत आहेत. पण गेल्या अनेक दिवसांपासून रोहित्र नादुरुस्त असल्याने कृषिपंप सुरू होत नाहीत. अनेक भागांत रोहित्राची एकदाही वीज वितरण कंपनी किंवा संबंधितांनी दुरुस्ती केली नाही. रोहित्राची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे. मात्र महावितरण विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. पावसाचा लपंडाव सुरू असला तरी सिंचनाकरिता मुबलक पाणी आहे.असे असताना केवळ महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे. शेतशिवारातील विद्युत रोहित्र जळाल्यामुळे पाणीपुरवठा करण्यास अडचण निर्माण होत आहे.

उद्या नवीन विद्युत रोहित्र बसून देणार

खैरी बे. गावातील विद्युत रोहित्र जळाल्याची तक्रार आजच आम्हाला प्राप्त झाली. याबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण केली असून उद्या नवीन विद्युत रोहित्र बसवून देण्यात येईल. – गजभिये, मुख्य लाईनमेन, एमएसईबी, भंडारा

डीपीला आग लागल्यास काय करावे. .

शेत शिवारात विद्युत रोहित्राला आग लागल्यास त्वरित वीजपुरवठा खंडित करा आणि महावितरण कंपनीला संपर्क साधा. आग लागण्याचे मुख्य कारण विद्युत रोहित्रातील बिघाड, शॉर्ट सर्किट किंवा जमिनीवरील झाडाझुडपांमुळे शॉर्ट सर्किट होणे हे असू शकते. रोहित्राला आग लागल्याने काही वेळेला पिकांचे नुकसान होते, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.