गडचिरोली : जिल्ह्यातील मुरुमगाव वनपरिक्षेत्र आणि देसाईगंज येथे वाघ आणि रानटी हत्तींच्या रहिवासी भागातील संचारामुळे वनविभाग दुहेरी संकटात सापडला आहे. दोन्ही वन्यप्राण्यांना नियंत्रणात आणण्यासाठी दोन प्रशिक्षित चमू जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. अनेक नागरिकांचे बळी घेणाऱ्या सीटी १ या नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी वनविभागाची एक चमू जंग जंग पछाडत आहे तर दुसरी चमू रानटी हत्ती रहिवासी भागात येऊ नये म्हणून रात्र रात्र जागून त्यांना पळवून लावण्याचे काम करीत आहे.
गेल्या दोन वर्षापासून स्थलांतरित वाघांमुळे गडचिरोली जिल्ह्यात तीसपेक्षा अधिक बळी गेले. दिवसेंदिवस वाघाचे हल्ले वाढतच आहे. आजपर्यंत या वाघांनी शेकडो पाळीव जनावरे फस्त केलीत. त्यामुळे परिसरात कायम दहशतीचे वातावरण असते. सध्या देसाईगंज तालुक्यात सीटी १ या नरभक्षक वाघाने धुमाकूळ घातला असून अनेक लोकांचा बळी घेतला आहे. त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने ताडोबा येथून प्रशिक्षित चमू बोलाविली असून कालपासून या चमूने वाघाचा शोध सुरू केला आहे. सध्या हा वाघ आरमोरी वनपरिक्षेत्रात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे, कधी नव्हे ते रानटी हत्तींचा कळप परत आल्याने मुरुमगाव वनपरिक्षेत्र चर्चेत आहे. या हत्तींना पळवून लावण्यासाठी पश्चिम बंगालहून प्रशिक्षित ‘हुल्ला गँग’ला पाचारण करण्यात आले आहे. जवळपास तीसच्या संख्येत असलेल्या या कळपाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. हत्तींच्या कळपाने मुरुमगाव वनपरिक्षेत्र परिसरातील मोडेटोला, येरमागड आणि दराची या गावातील आठ घरे आणि शेतीचे मोठे नुकसान केले आहे. वन विभागाकडून वेळोवेळी सावधगिरीच्या सूचना देण्यात येत आहे. नुकसानीचापंचनामा देखील सुरू आहे. मात्र, हे हत्ती रात्रीच्या सुमारास गावात येत असल्याने अवेळी नागरिकांना घर सोडून सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा लागत आहे. परिस्थितीवर नियंत्रणासाठी प्रशिक्षित चमू जिल्ह्यात दाखल झाल्याने लवकरच स्थिती पूर्वपदावर येईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.