गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव परिसरात संजयनगरची पाच वर्षे चिमुकल्यावर बिबट्याच्या हल्ल्याने मृत्यूची घटना ताजी असतानाच दुसरी घटना घडली आहे. रात्रीच्या वेळी गाढ झोपेत असताना एका महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना देवरी तालुक्यातील ग्रामपंचायत पळसगाव अंतर्गत मौजा धमदीटोला रविवारी पहाटे दीड वाजताच्या सुमारास घडली. मृत महिलेचे नाव प्रभाबाई शंकर कोराम (४९, रा.आलेवाडा ता. देवरी) असे आहे. या घटनेमुळे संपूर्ण धमदीटोला परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाबाई कोराम ही मागील एक महिन्यापासून मुलीच्या बाळंतपणाकरिता धमदीटोला येथे आली होती. सर्व काही सुरळीत चालू असताना, शनिवारी रात्री कुटुंबातील सर्वजण जेवण करून झोपी गेले होते. प्रभाबाई ही खाटेवर झोपली होती. पहाटे अंदाजे दीडच्या दरम्यान वाघाने प्रभाबाईवर हल्ला करीत तिला घरातून फरफटत तुरी लावलेल्या घरामागच्या वाडीत नेऊन ठार केले. ही बाब घरातील सदस्यांना सकाळी माहिती होताच त्यांनी आरडाओरड केली. घटनास्थळी गावकरी जमा झाले. वन अधिकाऱ्यांना तसेच पोलीस अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अशा घटना दिवसेंदिवस वाढत असूनही, वनविभाग कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करीत नसल्यामुळे, गावकरी संतप्त झाले आहे. गावकऱ्यांनी चक्का जाम आंदोलन केले आहे. ही घटना कोणते वळण घेते याकडे लक्ष लागले असून वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये सातत्याने होत असलेली वाढ लक्षात घेऊन ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे मृतकाच्या कुटुंबाला वेळीच मदत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसात वाघाच्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या लोकांच्या संख्येत वाढ होत असून, अर्जुनी/मोर, तालुक्यातील संजयनगर येथील बिबट्याच्या हल्लात चिमुकला ठार झाल्याची घटना ताजी आहे. घमदीटोला येथे मृतक महिला साखर झोपेत असतानाच मध्यरात्री वाघाने हल्ला चढवत चक्क मच्छरदाणी आणि अंगावर ओढलेल्या ब्लँकेटसह मृतक महिलेला ओढत नेऊन शरीराचे लचके तोडले. कुटुंबीयांनी सकाळी हा प्रसंग बघताच आरडाओरड सुरू केला. वन्य प्राण्यांचे मानवी हल्ले थांबण्याचे चिन्ह सध्या तरी दिसून येत नाही अशा घटनांमध्ये दिवसागणित वाढच होत आहे. घटनेनंतर धमदीटोला येथील जमलेल्या लोकांचा संताप अनावर झाला व येथील संतप्त नागरिकांनी वन विभागाचे वनरक्षक जायभाय आणि परिसरातील वनमजूर मोहुरले यांना मारहाण केली.
धमदीटोला येथे वाघाच्या हल्ल्यात मृत महिला प्रभाबाई शंकर कोराम यांच्या कुटुंबीयांना वन विभागातील नियमानुसार त्वरित एक लाख रुपयांचा चेक देण्यात आला आहे. तसेच उर्वरित रक्कम पुढील पाच-सहा दिवसात देण्यात येणार आहे.वाडे, दक्षिण देवरीचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी