नागपूर : राज्यातील व्याघ्रप्रकल्पांच्या पावसाळी सुट्या आता संपत आल्या आहेत आणि एक ऑक्टोबरपासून पर्यटनाला सुरुवात होत आहे. मात्र, पावसाळ्यातही बफर क्षेत्रातील पर्यटन सुरूच होते आणि यादरम्यान वाघांच्या अनेक करामती वन्यजीव छायाचित्रकारांच्या कॅमेऱ्यात कैद झाल्या. असाच एक व्हिडिओ वन्यजीव छायाचित्रकार अरविंद बंडा यांनी चित्रित केला आहे. या व्हिडिओत वाघ शिकारीसाठी रानगव्यावर डोळा ठेवून होता, पण रानगव्यानेच वाघाला आव्हान दिले आणि वाघाची पळता भूई थोडी झाली.

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघांचे व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत असतात. अलीकडेच भर पावसात वाघाच्या समोरुन हरणांचा कळप जातो, पण एकही शिकार त्याच्या हाती लागत नाही. त्यामुळे हताश झालेला वाघ भर पावसातच रस्त्यावर ठाण मांडतो, असा एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. आता पुन्हा ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील एका व्हिडिओने वाघ प्रत्येकचवेळी जिंकू शकत नाही, त्यालाही हार पत्करावी लागते, हे दाखवून दिले आहे. वाघाची चाहूल लागली की पक्षी, माकड, प्राणी सारेच अलर्ट होतात. एक विशिष्ट आवाज काढून ते वाघाचा धोका असल्याचे एकमेकांना सुचित करतात. तरीही एन्काउंटर होतेच.

पावसामुळे सर्वत्र गवत वाढलेले असताना या गवतात वाघ लपून बसला तरी तो दिसत नाही. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील या व्हिडिओमध्ये सावज दृष्टीपथात आल्यानंतर त्याला हेरण्यासाठी वाघ गवतात लपून बसतो. समोरुन रानगवा येताना दिसताच सावज आता टप्प्यात आल्याच्या अविर्भावात वाघ एक पाऊल समोर टाकायला जातो. तर समोरुन येणाऱ्या भल्यामोठ्या रानगव्याला वाघाची चाहूल लागते. वाघ आता आपली शिकार करणार याची जाणव त्याला होते, पण तरीही तो पळ न काढता वाघालाच मोठमोठा आवाज करत आव्हान देतो. रानगव्याचा आक्रमक पवित्रा पाहून त्याच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत असलेला वाघ समोर केलेले पाऊल मागे घेतो आणि तेथून पळ काढतो. शिकारी कितीही तरबेज असला तरीही त्याला कधीतरी पाऊल मागे घ्यावेच लागते, हे या व्हिडिओतून समोर आले आहे.

रानगवा आकाराने अतिशय मोठा आणि अधिक वजनाचा प्राणी असला तरीही वाघ त्याची शिकार करतो. नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पात अवघ्या दीड ते पाऊणेदोन वर्षाच्या ‘जय’ या वाघाने रानगव्याची शिकार केली होती. ताडोबात मात्र वेगळेच चित्र दिसून आले. वाघाने रानगव्यापुढे नांगी टाकली आणि रानगव्याची शिकार करण्यासाठी लपून बसलेल्या वाघाला पळून जावे लागले.