Tipeshwar Yavatmal Tiger Movement नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील एका वाघाने तब्बल ६०० ते ७०० किलोमीटरचे अंतर कापून धाराशिव जिल्हा गाठला आहे. जिल्ह्यातील येडशी रामलिंग घाट वन्यजीव अभयारण्यात हा वाघ स्थिरावला आहे. यापूर्वी देखील संभाजीनगर जिल्ह्यातील गौताळा अभयारण्यात टिपेश्वरचा वाघ स्थिरावला आहे. गेल्या काही वर्षात अनेक वाघ यवतमाळ जिल्ह्यातून स्थलांतरित झाले असून चार वाघांच्या स्थलांतरणाची अधिकृत नोंद आहे.
मे २०२३ मध्ये ‘तारु’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या तीन वर्षाच्या वाघाने स्थलांतरणाचा प्रवास सुरू केला. या प्रवासादरम्यान हा वाघ तेलंगणातील आदिलाबादमध्ये भटकला. त्यानंतर नांदेड आणि लातूर जिल्ह्यातील अहमदपूरमध्ये त्याने प्रवेश केला. दरम्यान, या वाघाला ‘रेडिओ कॉलर’ लावून सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात त्याचे स्थलांतर करण्याचा निर्णय वनखात्याने घेतला. त्यासाठी जानेवारी ते एप्रिल २०२५ या कालावधीत तब्बल ७५ दिवस मोहीम राबवण्यात आली. मात्र, हा वाघ वनखात्यातील अधिकाऱ्यांच्या हाती लागला नाही. त्याचा शोध घेण्यासाठी काहीवेळा ड्रोनचा देखील वापर करण्यात आला. यावेळी तो दोन-तीन वेळाच दिसला, पण अधिकाऱ्यांच्या हातावर तुरी देण्यात वाघ यशस्वी ठरला.
त्यामुळे ही मोहीम थांबवण्यात आली. मात्र, आता हा वाघ आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये भटकंती करत असला तरीही धाराशिव जिल्ह्यातील २२.५० चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या येडशी रामलिंग वन्यजीव अभयारण्यात स्थिरावला आहे. याठिकाणी त्याला आवश्यक असणारे भक्ष्य देखील मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे टिपेश्वर अभयारण्यात ‘तारु’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाघाचे नामकरण आता ‘रामलिंग’ असे करण्यात आले आहे. येडशीमध्ये या वाघाने प्रवेश केल्यानंतर कॅमेरा ट्रॅपमधील त्याचे छायाचित्र टिपेश्वरमधील त्याच्या पूर्वीच्या छायाचित्रांशी जुळवण्यात आले. भविष्यातील वाघाच्या निरोगी पिढीसाठी वाघांचे स्थलांतर महत्त्वाचे मानले जाते.
स्थलांतराचा पूर्वेतिहास..
यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून यापूर्वीदेखील एका दोन वर्षाच्या वाघाने साडेतीन हजार किलोमीटरपेक्षाही अधिकचा प्रवास केला. यादरम्यान तो तेलंगणा, आदिलाबाद, पैनगंगा अभयारण्य, ज्ञानगंगा अभयारण्य, अजिंठा-वेरूळ येथेही फिरला आणि शेवटी ज्ञानगंगा येथे स्थिरावला. त्याच्या या भ्रमंतीमुळे त्याला ‘वॉकर’ असे नाव देण्यात आले. फेब्रुवारी २०१९ मध्ये त्याचा प्रवास सुरू झाला होता आणि अवघ्या वर्षभरात तो एवढे अंतर फिरून परतला. त्यानंतर करोनाकाळात याच अभयारण्यातील एका वाघाने तब्बल दोन हजारपेक्षाही अधिकचा प्रवास केला. हा वाघ आता गौताळा अभयारण्यात स्थिरावला आहे. हा वाघ देखील पांढरकवडा, उमरखेड, तेलंगणा राज्यातील काही जिल्हे, अकोला, ज्ञानगंगा असा प्रवास करत गौताळा अभयारण्यात पोहोचला.
डाटाबेस तयार होणार…
संरक्षित क्षेत्रासह इतरही क्षेत्रात वाघाचा आढळ आहे. त्याचा ‘डाटाबेस’ आवश्यक असून त्यासाठी आम्ही ‘व्हॉट्सॲप’ या समाजमाध्यमावर एक समूह तयार करत आहोत. यात यवतमाळ, अमरावती जिल्ह्यातील वन्यजीव विभागासह प्रादेशिक विभागातील सर्व अधिकारी सदस्य असतील. या समूहात दररोज वाघ, बिबट्यांचे छायाचित्र व त्याचे ‘जिओटॅग लोकेशन’ याची माहिती देणे आवश्यक राहील. आठवड्याच्या अखेरीस ही माहिती एकत्र केली जाईल. यामुळे अधिसूची एकमधील बिबट आणि विशेषकरून वाघाच्या स्थलांतरणाची माहिती आणखी स्पष्ट होईल. तसेच नेहमीसाठी एक ‘डाटाबेस’ तयार होईल.- उत्तम फड, विभागीय वनाधिकारी (वन्यजीव विभाग), पांढरकवडा.