चंद्रपूर : वाघिण व तिची तीन पिल्ल अशा वाघाच्या एकत्रित कुटूंबाने रानगव्याची नियोजनपूर्वक शिकार केल्याचा थरारक व्हीडीओ समाज माध्यमावर सध्या सार्वत्रिक झाला आहे. मोहर्ली वनपरिक्षेत्रातील जुनोना बफर मधील हा व्हीडीओ असल्याची समाज माध्यमावर चर्चा असली तरी हा व्हीडीओ नेमका कुठला आहे याची अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र कुटूंबाच्या एकत्रित शक्तीने रानगव्याची शिकार केल्याचे या व्हीडीओतून दिसत आहे.या जिल्ह्यात सर्वत्र वाघ दिसत आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे जंगल असो की ब्रम्हपुरी, सिंदेवाही, मध्य चांदा, राजुरा, पोंभूर्णा, बल्लारपूर लगतच्या जंगलात सर्वत्र वाघ दिसून येत आहे. तेंदू हंगामामुळे मागील काही दिवसात नऊ जणांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यामुळे मागील काही दिवसात तीन वाघ जेरबंद देखील करण्यात आले.

मात्र सध्या वाघाच्या एकत्रित कुटूंबाने रानगव्याची शिकार केल्याचा व्हीडीओ समाज माध्यमावर सार्वत्रिक झाला असून या व्हीडीओची सर्वत्र चर्चा सुरू आहे. मोहुर्ली वनपरिक्षेत्रातील जुनोना बफर जंगलातील हा व्हीडीओ असल्याचे समाज माध्यमावर सांगण्यात येत आहे. जंगल भ्रमंतीसाठी आलेल्या एका जिप्सीतून युवकांनी हा व्हीडीओ घेतला आहे. या व्हीडीओत युवक आपसात मराठीत बोलत आहे. त्यामुळे हा व्हीडीओ एक तर चंद्रपूर जिल्ह्यातील किंवा विदर्भातील असावा असे सांगण्यात येत आहे. या व्हीडीओ मध्ये वाघिण व तिच्या तीन पिल्लांना जंगलात निलगाय भेटते. तीन पिल्ल सुरूवातीला रानगव्यासोबतच खेळतात.

मात्र तिन्ही पिल्ल व वाघिण असे वाघाचे एकत्रित कुटूंब रानगवाला सुरूवातीला खेळवतात आणि अतिशय पध्दतशिरपणे तिची शिकार करतात असे या व्हीडीओत दिसते. वाघिण रानगवाला मागून पकडते. त्यानंतर तिच्या नरडीचा घोट घेते. तसेच वाघिणीचे तीन पिल्ल रानगवाच्या शरीरावर ताबा मिळवितात. वाघिण रानगवाचे प्राण जात पर्यंत तिची नरडी सोडत नाही असेह या व्हीडीओत दिसून येते. रानगवाने प्राण त्यागल्यानंतरच वाघिण तिची नरडी सोडते. वाघिण रानगवाच्या नरडीचा घोट घेते तेव्हा रानगवा मोठा आवाज करते.

वाघिणीचे एकत्रित कुटूंब कशा पध्दतीने रानगव्याची शिकार करतात हे या व्हीडीओत स्पष्टपणे दिसून येते. सध्या या व्हीडीओने समाज माध्यमावर चांगलाच धुमाळूळ घातला आहे. दरम्यान हा व्हीडीओ नेमका कुठल्या जंगलातील आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा व्हीडीओ जिप्सीतील युवक चित्रीत करित असल्याचेही यात स्प्ष्टपणे दिसून येते. वाघिणीच्या कुटूंबाच्या एकत्रित शक्तीसमोर रानगव्याचा प्रतिकार कमी पडत असल्याचेही यात दिसून येते.