नागपूर : माणसांना नाही, पण वन्यजीवांना पर्यावरणाची नक्कीच चिंता आहे आणि म्हणूनच त्यांच्या पाणवठ्यावर तरंगत असलेली प्लास्टिकची बाटली तोंडात पकडून ती बाहेर काढणाऱ्या ताडोबातील वाघिणीची चित्रफित आणि छायाचित्र आता इटली, युकेसह इतर काही देशात आणि भारतातील काही राज्यात पर्यावरण संदेश देण्यासाठी वापरली जात आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील निमढेला बफर क्षेत्रात ‘नयनतारा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वाघिणीचा पालक ‘छोटा मटका’ या नावाने ओळखला जाणारा वाघ आहे. निमढेल्यातील जांभूळढोह परिसरातील सिमेंट बंधारालगतच्या वाहत्या पाण्यातून प्लास्टिकची बाटली तोंडात पकडून बाहेर काढतानाचा हा क्षण पर्यटनादरम्यान वन्यजीव छायाचित्रकार दीप काठीकर यांनी अलगद टिपला. २३ सेकंदाचा हा व्हिडिओ त्यापेक्षाही कमी वेळात समाजमाध्यमांवर पसरला. ‘लोकसत्ता’त वृत्त आल्यानंतर त्याची दखल अनेकांनी घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या या चित्रफितीवर भाष्य केले होते.

इटली या देशात या चित्रफितीची दखल घेतली गेली. इटलीतील कॅम्पिडोग्लिओच्या प्रोमोटेका सभागृहात आयोजित इटालिया ग्रीन फिल्म फेस्टिवल पुरस्कार सोहोळ्यात ताडोबातील ‘नयनतारा’ वाघिणीच्या या चित्रफितीला पुरस्कार देण्यात आला. दीप काठीकर यांच्यावतीने इटलीतील भारतीय दुतावासातील आयचा सालेम यांनी हा पुरस्कार स्विकारला. पर्यावरण आणि निसर्गाशी निगडीत हवामानबदल, प्रदूषण, जंगलतोड, पर्यावरणावर जागरुकता निर्माण करणाऱ्या लघुपटांना येथे पुरस्कार देण्यात येतो. इंग्लंडमध्ये सरकारी वाचनालयांमध्ये ही चित्रफित नियमित दाखवून पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यात येते.

भारतात आंध्रप्रदेशमध्ये एसटी बसेसवर प्लास्टिक बाटली तोंडात पकडणाऱ्या ‘नयनतारा’ वाघिणीचे छायाचित्र लावून त्याखाली पर्यावरणाचा संदेश देण्यात आला आहे. तर ओडिशा सरकारने तिथल्या अभयारण्यांमध्ये या वाघिणीचे छायाचित्र वापरुन एकरी वापराच्या प्लास्टिकला उद्यान आणि अभयारण्यांमध्ये बंदी घातली आहे. ‘हैद्राबाद टायगर कन्झर्वेशन सोसायटी’ने तेलंगणा वनविभागसासोबत मिळून येथील व्याघ्रप्रकल्पांमध्ये प्लास्टिक बंदी केली आहे.त्यासाठी त्यांनी ताडोबातील या वाघिणीचे छायाचित्र वापरले आहे. वन्यजीवांसाठी प्लास्टिक किती धोकादायक आहे, असा संदेश दिला आहे. ही चित्रफित समाजमाध्यमावर पसरल्यानंतर महाराष्ट्रातील पेंच व्याघ्रप्रकल्पाने पर्यटकांना प्लास्टिक बाटली वापरण्यास मनाई केली असून, याठिकाणी पर्यटकांना आता जाताना ते काचेची पाण्याची बाटली देतात. माणसांना जे जमले नाही ते ताडोबातील या वाघिणीच्या चित्रफितीने करुन दाखवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पर्यावरण संदेशसाठी या चित्रफितीची दखल घेतली.