नागपूर : सह्याद्रीत अधिवास करणारी “एसकेटी-०२” ही वाघीण सह्याद्रातील वाघांचा वंश वृद्धिंगत करणारी सह्याद्रीची जननी ठरली आहे. २०१४ ते २०२५ या कालावधीत या वाघिणीने तीन वेळा पिल्लांना जन्म दिल्याची नोंद करण्यात आली असून तिच्या लेकी देखील आता सह्याद्रीच्या खोऱ्यात प्रजनन करत आहेत. कणखर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये आजही वाघांचा कायमस्वरुपी अधिवास आहे. वनविभागाच्या मदतीने हा अधिवास अभ्यासण्याचे काम ‘वाईल्डलाईफ काॅन्झर्वेशन ट्रस्ट’चे वन्यजीव संशोधक गिरीश पंजाबी आणि त्यांचे सहकारी करत आहेत. सह्याद्रीतील वाघांच्या संचार मार्गाला सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्ग म्हटले जाते. सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गाचा विस्तार हा महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पापासून दक्षिणेकडे कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पापर्यंत आहे. संपूर्ण भ्रमणमार्ग प्रदेशात साधारण ३२ वाघांचे अस्तित्व आहे, तर केवळ महाराष्ट्रातील सह्याद्रीचा विचार केल्यास ही संख्या ११ ते १२ च्या घरात आहे. यामधील  “एसकेटी-०२” या वाघिणीच्या अस्तित्वाची नोंद पंजाबी २०१४ सालापासून करत आहेत. “एसकेटी-०२” या वाघिणीने २०१३, २०१५ आणि २०१७ या कालावधीत पिल्लांना जन्म दिला आहे.

२०१७ सालानंतर तिच्यासोबत पिल्लांची नोंद करण्यात आलेली नाही. २०२३ साली कॅमेऱ्यात टिपलेल्या फोटोवरुन ती गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. मात्र, पिल्लांची नोंद झाली नाही. सद्यस्थितीत अंदाजे १५ वर्षाची असणारी ही वाघीण आजही निर्भयपणे महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या जंगलात वावरत आहे. त्यामुळे सह्याद्रीतील वाघांचा कुळ ती अजून कितपत वाढवेल हा येणारा काळच ठरवेल.

पिल्लांच्या नोंदी

– सर्वप्रथम २०१४ साली “एसकेटी-०२” वाघिणीचे छायाचित्र पंजाबी आणि टीमला कॅमेरा ट्रॅपिंगच्या माध्यमातून मिळाले.

– त्यावर्षी “एसकेटी-०२” वाघिणीच्या हद्द क्षेत्रात एक पूर्ण वाढ होत आलेली दुसरी मादीही आढळून आली.

– २०१५ साली “एसकेटी-०२” वाघीण गवा खाताना कॅमेऱ्यात टिपली गेली. त्यावेळी तिच्यासोबत तीन पिल्ल आढळली.

– २०१७ साली पुन्हा एकदा “एसकेटी-०२” वाघिणीसोबत लहानग्या तीन पिल्लांची नोंद करण्यात आली.

 -२०२१ साली ही मादी गोव्यातील म्हादाई अभयारण्यात आढळली. तर २०१५ साली “एसकेटी-०२” च्या पोटी जन्मास आलेली “एसकेटी-०२” ही मादी आता प्रौढ झाली असून तिच्यासोबत २०२४ साली तीन पिल्ले वावरताना दिसली.

“एसकेटी-०२” वाघीण व तिची पिढी सह्याद्रीतील व्याघ्र संवर्धनाचे यश दर्शवते. व्याघ्र पुनर्स्थापना, शाकाहारी प्राण्यांचे पुनर्वसन, आणि लँडस्केपस्तरीय व्यवस्थापन ही पुढील धोरणात्मक पावले आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पश्चिम घाटात व्याघ्र पुनरुज्जीवनाचा आदर्श ठरत आहे.-तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोल्हापूर</p>

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि काली व्याघ्र प्रकल्प यांच्यातील कॉरिडॉरचे संरक्षण करणे हे सह्याद्रीतील मधील वाघांच्या नैसर्गिक वसाहतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या सह्याद्रीत वाघ आहेत, तरी कॉरिडॉरमध्ये प्रजनन करणाऱ्या वाघिणीची उपस्थिती हे एक सकारात्मक चिन्हे आहे.-गिरीश पंजाबी, संशोधक– वाईल्डलाईफ काॅन्झर्वेशन ट्रस्ट

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पचे चांगले वनव्यवस्थापनमुळे तिलारी ते राधानगरी, राधानगरी ते चांदोली,  चांदोली ते कोयना हा भ्रमण मार्ग (कॉरिडॉर) याचे संवर्धन झाल्याचे हे सिद्ध करते व भ्रमण मार्ग चे महत्व अधोरेखित करते.-रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक