नागपूर : तोंडाने शीळ घालून सहकाऱ्यांना एकत्र करायचे आणि मग सावज जाळ्यात अडकताच सर्वांनी एकत्र झडप घालायची. त्या सावजाच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडायचे आणि त्याला पूर्णपणे संपवूनच दूर व्हायचे ही रानकुत्र्यांची म्हणजेच ढोल या प्राण्यांची शिकारीची पद्धत. जंगलात वाघ बघायला सारेच जातात, पण दिसायला अत्यंत सुंदर, पण तेवढाच क्रूर शिकारी आहे, हे अनेकांच्या लक्षात येत नाही. यांचा अतिशय सुंदर असा व्हिडिओ विभागीय वनाधिकारी स्वप्नील भोवटे यांनी टिपेश्वरच्या जंगलात टिपला.

सावजाला शिकाऱ्याची चाहूल लागली की ते अक्षरशः जीव मुठीत घेऊन पळतात, या रानकुत्र्यांच्या तावडीतून सुटणे अशक्य आहे. सावज शिकाऱ्यापासून वाचण्यासाठी पळत असताना मागून हे रानकुत्रे त्या सावजाचे लचके तोडायला सुरुवात करतात. रानकुत्रे शिकारीसाठी एकत्र येताना आपल्या सहकाऱ्यांना वेगळ्या प्रकारची ‘शीळ’ घालून खुणावत असल्याने त्यांना रानकुत्र्यांना ‘शीळवाले शिकारी’ म्हणूनही ओळखले जाते. त्यांच्या शिकारीच्या आड वाघ किंवा बिबट्या जरी आला, तरी ते त्यालाही जुमानत नाहीत. त्याच्यावरही चहूबाजूंनी हल्ला चढवून त्यालाही पळवून लावतात.

हेही वाचा – रथातच बसणार… शरद पवारांचा हट्ट अन् नेत्यांची उडाली तारांबळ

देशातील रानकुत्र्यांच्या संवर्धनासाठी चांगली कामगिरी करणाऱ्या तीन राज्यांमध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक आणि मध्यप्रदेश या राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील पश्चिम घाटात शेकडोंच्या संख्येने रानकुत्र्यांचा अधिवास असून जैवविविधतेच्या दृष्टीने ही एक चांगली बाब असल्याची नोंद एका अहवालात करण्यात आली आहे.

भारतातील वाइल्डलाइफ कन्झर्वेशन सोसायटी, वाइल्डलाइफ कन्झर्वेशन ट्रस्ट, युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडा आणि द नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स या संस्थांमधील अभ्यासकांनी केलेल्या अभ्यासानुसार, महाराष्ट्रात पश्चिम घाटात परिसरात विकास प्रकल्पांचे प्रमाण कमी असल्याने या प्राण्यांचा अधिवास सुरक्षित राहिल्याचे अभ्यासात सांगण्यात आले. टिपेश्वर अभयारण्यात आता वाघच नाही तर या रानकुत्र्यांनीही पर्यटकांना आकर्षित करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर इतरही प्राणी आणि पक्ष्यांच्या अस्तित्त्वामुळे या अभयारण्याकडे पर्यटकांची पावले वळत आहेत.

हेही वाचा – “महायुती भ्रष्ट उमेदवार देणार की नवीन चेहरा देणार?”, भावना गवळींच्या उमेदवारीवर आदित्य ठाकरेंची टीका; म्हणाले…

विभागीय वनाधिकारी यू. फड, सहाय्यक वनसंरक्षक आर. कोंडावार, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. येवतकर आणि वनपरिक्षेत्र अधिकारी एम. बाळापुरे यांच्या प्रयत्नांमुळे टिपेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या सीमा सुरक्षित झाल्या आहेत. गवताळ प्रदेश व्यवस्थापनासह या उपक्रमामुळे हरीण, रानडुक्कर, निळे बैल आणि इतर प्रजाती टिपेश्वरच्या बाहेरील शेतजमिनी टाळू लागल्या आहेत. परिणामी, या जिल्ह्यातील मानव-प्राणी संघर्षात लक्षणीय घट झाली आहे. हा सकारात्मक परिणाम अभयारण्यातील शाकाहारी प्राण्यांच्या आणि अगदी वाघांच्या वाढलेल्या दृश्यांवरून दिसून येतो.