गडचिरोली : छत्तीसगडमधील गारियाबंद जिल्ह्यातील जंगलात गुरुवारी सुरक्षा दल व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत एक कोटीचे बक्षीस असलेला केंद्रीय समिती सदस्य मोडेम बाल कृष्णा ऊर्फ बालन्ना मनोज (६१) याच्यासाह १० नक्षलवादी ठार झाले. यामध्ये ओडिशा राज्य समिती सदस्य प्रमोद ऊर्फ पांडू या नक्षल नेत्याचादेखील समावेश असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
जंगलात नक्षलविरोधी मोहीम सुरू असताना दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा दलानेही जोरदार प्रत्युत्तर दिले. तब्बल आठ तास चाललेल्या या चकमकीत १० नक्षलवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आले. अद्याप काही नक्षलवादी जंगलात दडून बसले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मोडेम बालकृष्णा ऊर्फ बालन्ना ऊर्फ मनोज हा मूळचा तेलंगणातील माडीकोंडा, घानपूर (जि. वारंगल) येथील रहिवासी होता. वयाच्या विशीतच नक्षलवादी चळवळीत सहभागी झाला. संघटनेतील एक महत्त्वाचा कॅडर म्हणून त्याची ओळख होती. बीजीएन डीव्हीसी सचिव, ओडिशा स्टेट इंचार्ज, सेंट्रल रिजनल ब्युरो मेंबर व सध्या केंद्रीय समिती सदस्य म्हणून त्याच्यावर जबाबदारी होती.
शस्त्रसाठा, कागदपत्रे जप्त
रायपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक अमरेश मिश्रा यांनी या कारवाईला दुजोरा दिला. घटनास्थळावरून शस्त्रसाठा, साहित्य आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. परिसरात शोधमोहीम सुरू असून नक्षलविरोधी कारवाई आणखी तीव्र केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
नक्षलवाद्यांना मोठा धक्का
या चकमकीत ठार झालेला केंद्रीय समिती सदस्य कमांडर मनोज हा बराच काळ छत्तीसगड व शेजारील महाराष्ट्रात सक्रिय होता. त्याच्या नेतृत्वाखाली अनेक हिंसक घटना घडल्या होत्या. त्याच्यावर शासनाने एक कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर केला होता. त्याला ठार करण्यात सुरक्षा जवानांना यश आल्याने नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.