वाघाच्या हल्ल्यात महिला वनरक्षकाचा मृत्यू झाल्यानंतर व्यवस्थापन सजग; जिप्सी वाहनांवर सुरक्षाकवच
नागपूर : भारतातील कोणत्याही व्याघ्रप्रकल्पात पर्यटनासाठी वापरली जाणारी वाहने बंदिस्त नाहीत. मात्र, महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी बंदिस्त वाहने वापरण्याबाबत विचार सुरू झाला आहे. त्यादृष्टीने व्यवस्थापनाने पहिले पाऊल टाकले असून सफारी जिप्सी वाहनांवर सुरक्षाकवच असणारे डिजाईन डिजायनर्स, फॅब्रिकेटर्स, अभियंता तसेच गॅरेज यांच्याकडून मागवण्यात आले आहे.
भारतात पावसाळा वगळता नऊ महिने दररोज दोन ते तीन हजार जिप्सी पर्यटकांना वन्यजीव सफारीसाठी घेऊन फिरतात. मात्र, गेल्या तीन-चार दशकात कोणत्याही व्याघ्रप्रकल्पात वाघाने किंवा मांसभक्षी प्राण्याने जिप्सीतील पर्यटकांवर हल्ला केल्याच्या आणि त्यात पर्यटक जखमी, मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडलेल्या नाहीत. राज्यात जंगल पर्यटनाचा सर्वाधिक भार ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पावर आहे. वाघांच्या सहज दर्शनामुळे राज्यातीलच नाही तर इतर राज्यातील पर्यटक देखील या व्याघ्रप्रकल्पात येतात. वाघ जिप्सीजवळ येण्याचा प्रकार या व्याघ्रप्रकल्पात बरेचदा घडला आहे. दोन वर्षांपूर्वी या व्याघ्रप्रकल्पात पर्यटक जिप्सीवर वाघ हल्ल्याच्या पवित्र्यात असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रसारित झाला होता. त्यानंतर उमरेड-करांडला अभयारण्यातही वाघ जिप्सीचा आरसा चाटतानाचा व्हिडिओ समोर आला होता. मात्र, पर्यटकांसह जिप्सीचालक, पर्यटक मार्गदर्शक यांच्याकडून होणारे नियमांचे उल्लंघन या प्रकारांना कारणीभूत ठरले आहे. वाघाने पर्यटक जिप्सीवर हल्ला केल्याच्या घटना गेल्या तीन-चार दशकात तरी समोर आल्या नाहीत. अलीकडेच व्याघ्रगणनेदरम्यान वाघाच्या हल्ल्यात एक महिला वनरक्षक मृत्युमुखी पडल्यानंतर ताडोबा व्यवस्थापन सजग झाले आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वन्यजीव सफारी अधिक सुरक्षित करण्यासाठी व्यवस्थापनाने हे पाऊल उचलले आहे. पर्यटनाचा आनंदही घेता यावा यादृष्टीने संतुलीत डिजाईन मागवण्यात आले आहे. सर्वोत्कृष्ट डिजाईनला २५ हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार असून हे डिजाईन जिप्सीसह इतर वाहनांवर बसवण्यासाठी व्यवस्थापनाकडून मंजूर करण्यात येईल. सहभागी होणाऱ्यांनी एक हजार रुपयांच्या डिजाईन ड्राफ्टसह हे डिजाईन mahaforest.gov.in या संकेतस्थळावर पाठवायचे असून २० डिसेंबरला ते निवड समितीसमोर ठेवण्यात येईल. त्यामुळे येत्या काही दिवसात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटक वाहनात बंदिस्त आणि त्यांच्या सभोवताल वन्यप्राणी मोकळे दिसायला लागले तर आश्चर्य वाटणार नाही.
वाघाच्या हल्ल्यात महिला वनरक्षकाच्या झालेल्या मृत्यूनंतर एकूणच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. त्यात वाघाचा मार्ग अवरुद्ध करणे, पाणवठय़ावर गर्दी करणे यासारख्या पर्यटन नियमांच्या होणाऱ्या उल्लंघनाचा विषय होता. त्याचबरोबर पर्यटन जिप्सी अधिक सुरक्षित करण्याबाबत उपाययोजनांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर यावर चर्चा देखील झाली. त्या अनुषंगानेच उचललेले हे पाऊल आहे.
– बंडू धोतरे, सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ.