वर्धा : देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प म्हणून बोर व्याघ्र प्रकल्पाची ओळख दिल्या जाते. तसेच विमानतळपासून सर्वात जवळचा असा हाच प्रकल्प असे म्हटल्या जाते. या प्रकल्पाची राणी म्हणून कॅटरिना या वाघिणीची ओळख दिल्या जात असते. तीचे दर्शन घडावे म्हणून जाणते पर्यटक व वन्यप्रेमी अनेकवार बोर अभयारण्यात चकरा मारत असण्याची बाब नवी नाही.

आता दिवाळीच्या सुट्ट्या. म्हणून असंख्य पर्यटक बोरकडे धाव घेत आहेत. सफारी तुडुंब भरल्या जात आहेत. त्यातच या जंगलाची राणी म्हणून विख्यात कॅटरिना ही तिच्या दोन शावकांसोबत दिसल्याची चर्चा सुरू झाली आणि पुन्हा गर्दी उसळली. कॅटरिना म्हणजे वाघातील अस्सल सौंदर्य, अशी महती सांगितल्या जाते. बोरचे अभ्यासक व वन्यप्रेमी आशीष गोस्वामी म्हणतात की, तिचे नाव कॅटरिना ठेवण्यात आले, यातच काय ते समजा.

दिसायला सुंदर, देखणी, ऐटबाज, बेडर, अशी ही वाघीण आहे. तिची चाल बघत राहावी अशी, एखाद्या मॉडेलसारखी. पर्यटकांना पण ती छान छबी टिपण्यास देते. बछडेपण तिच्याच तालमीत ती तयार करते. एक आदर्श माता तिला म्हणता येईल. अशी रुपगर्विता अन्यत्र आढळून आली नाही, अशी टिपणी गोस्वामी करतात. ती बहुप्रसवा म्हणजे अनेक पिल्लांना जन्म देऊन चुकलेली मादा आहे. एकदा ती मध्यप्रदेशात गेल्याची नोंद आहे. मात्र, परत ती आपल्या हक्काच्या अधिवासात म्हणजे बोर येथे परतली.

बोर बाहुजीनसी व्याघ्र प्रकल्प असल्याचे म्हटल्या जाते. वृक्ष, पक्षी, प्राणी याचे विपुल वैविध्य दिसून येते. तसेच पशु प्रजननासाठी उत्कृष्ट ठिकाण समजल्या जाते. म्हणजे ताडोबापेक्षा येथे वर्दळ कमी आहे. अत्यंत शांत असे हे ठिकाण म्हणून ओळख आहे. बोरचे वनरक्षक मंगेश ठेंगडी म्हणतात की, पर्यटकांना कॅटरिना दिसल्याची चर्चा ऐकली. खरे असू शकते. तर दुसरीकडे हा पर्यटन फंडा तर नव्हे ना, अशी शंका पण व्यक्त केली जात आहे.

कॅटरिनाचे वन खात्याचे नाव बीटी ३ असे आहे. सध्या तिच्यासोबत दोन शावक आहेत. आजवर तिने ७ पिल्ले जन्मास घातल्याचे सांगितल्या जाते. १३ वर्षीय पूर्ण विकसित या वाघिणीची चाहूल लागणे, तीचे दर्शन घडणे, फोटो काढायला मिळणे या बाबी दुर्मिळ समजल्या जातात. मात्र आता तिचे दर्शन झाल्याची बाब चांगलीच चर्चेत आली आहे. जुन्या की नव्या बोर प्रकल्पात ती दिसली, यावर अधिकृत भाष्य कोणी करीत नाही.