नागपूर : भारताची संस्कृती, परंपरा, श्रद्धा याकडे इतरही देशांचा कल वाढत चालला आहे. इथले सण, उत्सव तेवढ्याच पारंपरिक पद्धतीने इतरही देशात साजरे केले जातात. गणेशोत्सव हा त्यातलाच एक. जगातील अनेक देशात गणरायाची पूजा भक्तीभीावाने केली जाते. मात्र, भारताबाहेरील या पाच देशात गणेशोत्सव अतिशय खास पद्धतीने साजरा केला जातो.
थायलंडमध्ये, भगवान गणेशाची पूजा ‘फ्रा-फिकानेत’ किंवा ‘फ्रा-फिकानेसुआन’ या नावाने केली जाते. दहाव्या शतकात श्रीगणेशाचा सर्वात जुना उल्लेख या देशात आढळला. त्यावेळी श्रीगणेशाची कांस्य मूर्ती फांग-ना येथून सापडली. एवढेच नाही तर थायलंडमधील चाचोएंगसाओ शहराला गणेश शहर या नावाने ओळखले जाते. कारण याठिकाणी श्रीगणेशाच्या मोठ्या मूर्ती स्थापित आहेत.
भारताप्रमाणेच, येथेही लोक गणेशाला अडथळे दूर करणारा आणि यश देणारा देव मानतात. नेपाळ या देशातही श्रीगणेशावर खूप श्रद्धा आहे आणि देशभरात अनेक भव्य मंदिरे बांधली गेली आहेत. काठमांडू खोऱ्यातील कमलादी गणेश मंदिर हे येथील सर्वात लोकप्रिय आहे. इतकेच नाही तर हे मंदिर पांढरे गणेश म्हणूनही ओळखले जाते. मंगळवारी येथे दर्शन घेणे खूप शुभ असते असे मानले जाते. याशिवाय दर मंगळवारी येथे मोठ्या संख्येने भाविक जमतात आणि बाप्पाला बुद्धी, यश आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात.
इंडोनेशियातील जावा बेटावर भगवान गणेशाची तांत्रिक देवता म्हणून पूजा केली जात असे. ही परंपरा १४ व्या आणि १५ व्या शतकात बौद्ध आणि शैव धर्माच्या मिश्रणातून येथे विकसित झाली. इतकेच नाही तर पूर्वी येथे २० हजार रुपयांच्या नोटेवर गणेश जीचे चित्र होते. याशिवाय, त्यांची ७०० वर्षे जुनी मूर्ती अजूनही पूर्व जावामधील माउंट ब्रोमोजवळ आहे, जी श्रद्धा आणि इतिहासाचे प्रतीक आहे. श्रीलंकेत श्रीगणेशाला ‘पिल्लयार’ म्हणतात आणि विशेषतः तामिळबहुल भागात त्यांची पूजा केली जाते. येथे भगवान गणेशाची १४ प्राचीन मंदिरे आहेत, ज्यांचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे.
याशिवाय, कोलंबोजवळील केलन्या गंगा नदीच्या काठावर बांधलेल्या अनेक प्रसिद्ध बौद्ध मंदिरांमध्येही गणेशाच्या मूर्ती स्थापित केल्या आहेत. येथे लोक गणेशाला अडथळे दूर करणारा आणि सुख आणि समृद्धी देणारा देव मानतात. जपानमध्ये गणेशाला कांगितेन म्हणतात. आठव्या शतकात तो भारतातून येथे आला होता अशी आख्यायिका आहे. कांगितेनला सौभाग्य आणि समृद्धीचा देव मानला जातो. इतकेच नाही तर व्यापारी, अभिनेते आणि कलाकार येथे विशेषतः त्यांची पूजा करतात. याशिवाय, जपानी संस्कृतीत गणेशाचे एका अनोख्या स्वरूपात चित्रण केले आहे.