जुन्याच ठिकाणी नवी रोपे; एमआयडीसीतील वनखात्याच्या जागेवरील प्रकार

दोन कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत हिंगणा एमआयडीसी परिसरातील वनखात्याच्या जमिनीवर गेल्यावर्षी चार हजार वृक्ष लावण्यात आले. त्यातील केवळ ५० टक्के रोपेच जगली असून त्याची भरपाई करण्यासाठी त्याच ठिकाणी नवीन रोपे लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे वृक्ष लागवड मोहिमेच्या जाहिरातबाजीवरच वनखात्याचा भर असून वृक्ष संगोपनाकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे सिद्ध झाले आहे.

गेल्यावर्षी दोन कोटी वृक्षलागवड मोहिमेची सुरुवात हिंगणा एमआयडीसी परिसरातील वनखात्याच्या जमिनीवर करण्यात आली. ही मोहीम एकाच दिवशी राज्यभर राबवण्यात आली. याठिकाणी सुद्धा चार हजाराच्या आसपास रोपटी लावण्यात आली. वनमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी अधिकाऱ्यांना करायची असल्याने जमिनीचा पोत आणि त्यावर कोणती झाडे लावायची याकडे न बघता जमेल त्या पद्धतीने वृक्षलागवडीचा कार्यक्रम रेटून नेण्यात आला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून मोहिमेची सुरुवात करण्यात आली. अनेक सामाजिक संस्था, त्यांचे प्रतिनिधी, शालेय विद्यार्थी अशा अनेकांनी या मोहिमेत उत्साहाने सहभाग घेतला. ‘सेल्फी वूइथ ट्री’ असे म्हणत एकाच झाडासोबत अनेकांनी छायाचित्रणही करून घेतले आणि दुसऱ्या दिवशी सर्वानी याकडे पाठ फिरवली. हिंगणा एमआयडीसीच्या जवळपास ८०० हेक्टर परिसरात लावण्यात आलेल्या सुमारे चार हजार रोपटय़ांपैकी माती अधिक असलेल्या ठिकाणावरील ५० टक्के रोपटय़ांनीच तग धरला. उर्वरित ५० टक्के रोपटय़ांच्या जागी केवळ वाळलेल्या काडय़ा उरल्या. ऊर्जाखात्याच्या अति उच्चदाबाच्या वीज वाहिनीमुळेही आग लागून काही रोपटी नष्ट झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे जी रोपटी तग धरू शकली नाही त्याच ठिकाणी आता जुने खड्डे मोठे करून त्यात माती भरून नवीन रोपटी लावण्यात आली.

चार कोटी वृक्षलागवडीच्या मोहिमेला शनिवारपासून सुरुवात होत आहे. त्या पाश्र्वभूमीवर कुणीही या जुन्या वृक्षलागवड मोहिमेचा आढावा घेऊ शकतो, म्हणून वनखात्याने ही नवी शक्कल लढवली. मात्र, असे करताना त्यांनी लहान रोपटी लावत पुन्हा चूक केली. त्यामुळे नव्याने लावलेली ही रोपटी त्यांची उंची पाहता कितपत तग धरतील याविषयी शंका आहे. गेल्यावर्षी या खडकाळ जमिनीवरही तग धरू न शकणारी रोपटी लावली होती, तर त्याऐवजी आता वड, पिंपळाची रोपटी यावेळी लावण्यात आली. वनखात्याने आधीच वृक्षलागवडीवर लाखो रुपयांचा खर्च केला आहे. या दुबार वृक्षलागवडीने या खर्चात आणखी भर घातली आहे.

मंत्र्यांनी लावलेल्याच वृक्षांची निगा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या परिसरात वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. मंत्र्यांनी लावलेले रोपटे असल्याने त्याची निगादेखील व्हीआयपींसारखीच राखण्यात आली. पाणी, खत देण्यापासून तर इतरही काळजी घेण्यात आली. मात्र, इतर रोपटी सर्वसामान्यांनी लावल्याने त्यांचे व्हीआयपी संगोपन झाले नाही. परिणामी या रोपटय़ांनी तग धरला नाही.