बुलढाणा : महाराष्ट्र राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करू नये ही आमची मागणी आहे. तसेच बंजारा, धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यास आमचा विरोध असल्याची माहिती आदिवासी समाज बांधवानी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे . या मागण्याकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सकल आदिवासी समाज बांधवाचा आदिवासी आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा बुलढाणा शहरात सोमवारी ६ ऑक्टोबर रोजी काढण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.
बंजारा, धनगर समाजाने केलेल्या अनु. जमातीत आरक्षण मागणीच्या विरोधात ६ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यलयावर हजारो आदिवासी बांधव धडक देणार आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली. आज शनिवारी, ४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी स्थानिक पत्रकार भवन येथे ही पत्रकार परिषद घेण्यात आली. एकलव्य संघटनेचे प्रदेश सचिव मधुकर पवार, आदिवासी विकास परिषदेच्या नंदिनी टारपे, गजानन सोळंके विदर्भ सचिव आदिवासी पारधी संघटना, विजय मोरे जिल्हाध्यक्ष एकलव्य भिल समाज, विनोद डाबेराव, राजेश टारपे यांनी ही माहीती दिली .या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की हैदराबाद गॅजेट हा महाराष्ट्रात लागू करण्यात येऊ नये, ही आमची प्रमुख मागणी आहे.सोबतच अनुसूचीत जमाती प्रवर्गामध्ये बंजारा, धनगर व इतर कोणत्याही जातीचा समावेश करण्यात येऊ नये, आदिवासी विकास विभागाचा निधी इतरत्र वळवू नये. वळविलेला निधी व्याजासहीत आम्हाला परत करण्यात यावा या आमच्या मागण्या आहे.
बोगस आदिवासींना देण्यात आलेले सेवा संरक्षण मागे घेऊन त्यांना बडतर्फ करण्यात यावे व त्या ठिकाणी तात्काळ खऱ्या आदिवासींची नोकर भरती करण्यात यावे, छ. संभाजी नगर येथे मुस्लिम धर्मीयांना टाकणकार जमातीची बोगस जात वैधता प्रमाणपत्र दिले, या गंभीर प्रकरणासाठी एस.टी.आय. समिती स्थापन करण्यात यावी व संबंधीत अधिकारी यांच्या फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, आदिवासीची हक्काची १२५०० अधिसंख्य पदभरती व ८५००० हजार रिक्त पदे भरण्यात यावी या मागण्यासाठी आमचा संघर्ष आहे. त्यासाठी बुलढाण्यात मोर्चा काढण्यात येणार आहे. विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषेत देण्यात आली. सदर मोर्चा हा स्थानिक जयस्तंभ येथील वीर एकलव्य महाराज पुतळ्या जवळ येथून दुपारी १२ वाजता सुरुवात होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.