चंद्रपूर : राजुरा – गडचांदूर मार्गावरील कापनगाव जवळ राजुरा येथून पाचगाव कडे जाणा-या एका ॲटोला विरूध्द दिशेने येणा-या हायवा ट्रकने जबर धडक दिली. या घटनेत ६ प्रवाशी ठार झाले असून तीन गंभीर जखमीला चंद्रपूर जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर एकावर राजुरा उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे. गुरूवारी (२८ ऑगस्ट) सायंकाळी ४.१५ वाजता ही दुर्देवी दुर्घटना घडली. मृतकांमध्ये ऑटो चालक प्रकाश मेश्राम, प्रवासी रवींद्र बोबडे, शंकर पिपरे व वर्षा बंडू मांदाळे, तनु सुभाष पिंपळकर, ताराबाई पप्पूलवार यांचा समावेश आहे तर अन्य चार प्रवासी जखमी आहे. तीन जखमींवर चंद्रपूर जिल्हा शासकीय रुग्णालयात तर एकांवर राजुरा उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरु आहे.

राजुरा येथुन पाचगाव येथे ॲटो चालक व सात प्रवाशी ॲटो (क्र.एम एच ३४ डी ३९४१) ने जात होते. राजुरा शहरापासून दोन किलो मीटर अंतरावर महामार्गाचे काम सुरू आहे. आज गुरूवारी अचानक येथे काम करण्यासाठी रस्ता वाहतुकीत बदल करण्यात आला. मात्र याविषयी कुठलेही माहिती फलक लावले नव्हते. यामुळे ॲटो चालक संभ्रमात पडला आणि महामार्गावर ॲटो घेतल्यानंतर विरूध्द दिशेने येणाऱ्या हायवा ट्रकने (क्र.आर जे जिडी ९२२१) ॲटोला धडक दिली.

ही धडक एवढी भीषण होती की संपुर्ण ॲटोचा चुराडा झाला. यावेळी तीन प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यु झाला तर अतिशय गंभीर अवस्थेत तीन जखमींना चंद्रपूर जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात रेफर करित असतांना रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला.

या दुर्घटनेत रवींद्र हरी बोबडे (४८), रा. पाचगाव, शंकर कारू पिपरे (५०) रा. कोची, सौ. वर्षा बंडू मांदळे, (४१), रा. खामोना, तनु सुभाष पिंपळकर (१८), रा. पाचगाव, ताराबाई नानाजी पापुलवार (६०), रा. पाचगाव आणि ऑटो चालक प्रकाश मेश्राम (५०), रा. पाचगाव या सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. याशिवाय चंद्रपूर जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात निर्मला रावजी झाडे (५०), पाचगाव यांना चंद्रपूर जिल्हा रूग्णालयात रेफर करण्यात आले असून भोजराज महादेव कोडापे (४०), भुुरकुंडा यांचे वर राजुरा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजुरा पोलिसांनी या अपघाताची दखल घेऊन तातडीने घटनास्थळी पोहोचून सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले आणि हायवा ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ट्रकचालक अद्याप फरार आहे. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे.

ठाणेदार सुमित परतेकी पुढील तपास करीत आहेत. यावेळी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे कार्यक्रमाकरिता कोरपना येथे जात असताना घटनास्थळी पोहोचले व घटनेची माहिती घेऊण मृतकांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले व जखमींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी राष्ट्रीय म्हमार्गाचे प्रकल्प संचालक यांना फोन करून सर्व्हिस रोडचे काम पूर्ण करणे, धोकादायक ठिकाणावर दिशादर्शक फलक लावणे व रस्त्याचे काम लवकरात लवकर करणे, काम पूर्ण होईतोपर्यंत सुरु असलेली वाहतूक थांबाविण्याच्या सूचना केल्या आहे.