अकोला : वाशीम जिह्यात दोन अपघातात तीन ठार झाल्याच्या घटना रविवारी घडल्या आहेत. भरधाव मोटारीने दोन दुचाकींना धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या अपघातात समृद्धी महामार्गावर ट्रकने अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला. समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे.
वाशीम जिल्ह्यातील कारंजा-दारव्हा मार्गावर भरधाव मालवाहू मोटारीने (क्र. एमएच २९ बी ७६८) दोन दुचाकींना जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी घडली. या अपघातात सुभाष किसन चव्हाण (५५ वर्ष रा.शिक्षक कॉलनी, कारंजा) आणि नाना जयसिंगपूरे (५६ वर्ष, रा.खरडगाव ता. नेर, ह.मु. यशवंत कॉलनी, कारंजा यांचा मृत्यू झाला, तर जया नाना जयसिंगपूरे (वय ५०) आणि प्रभू माणिक राठोड (वय ४८ रा. कामठवाडा ता. कारंजा) हे गंभीर जखमी झाले आहेत. नाना जयसिंगपूरे हे पत्नी जया यांच्यासह तेरवीच्या कार्यक्रमासाठी नेर तालुक्यातील लोही येथे दुचाकीने (क्र. एमएच ३७ डी ६८१७) जात होते. सुभाष चव्हाण हे प्रभू राठोड यांच्यासह शेतीचे काम आटोपून दुचाकीने (क्र. एमएच ३७ एबी ५२१२) कारंजाकडे येत होते. यावेळी भरधाव मालवाहू मोटारीने दोन्ही दुचाकींना जबर धडक दिली.
अपघातग्रस्तांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून दोघांना मृत घोषित केले. गंभीर जखमी प्रभू राठोड यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलविण्यात आले, तर जया जयसिंगपुरे यांच्यावर स्थानिक खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर मालवाहू मोटारीचा चालक वाहन घटनास्थळावर सोडून पसार झाला. या प्रकरणी कारंजा शहर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. सुभाष चव्हाण हे मूळचे रामगाव रामेश्वर (ता. दारव्हा) येथील असून ते जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. त्यांच्या पत्नी विजया चव्हाण ग्रामसेविका आहेत. नाना जयसिंगपूरे हे मुरंबी (ता. कारंजा) येथील पशुसंवर्धन विभागात कार्यरत होते. या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
दुसरा अपघात समृद्धी महामार्गावर कारंजाजवळ नागपूरकडे जाणाऱ्या दिशेवर घडला. ट्रकच्या (क्र.एमएच ४२ बीएफ ५७२५) चालकाला झोपेची डुलकी आल्याने अज्ञात वाहनाला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला. मृतकाची ओळख पटू शकली नाही. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.