भंडारा : भंडारा येथे गणपती दर्शनासाठी आलेल्या एका दांपत्याच्या दुचाकीला ट्रकने जबर धडक दिली. या अपघातात दुचाकी चालकाचा ट्रकच्या खाली आल्याने जागीच मृत्यू झाला. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. मृतकाला रक्ताच्या थारोळ्यात बघून नातलगांच्या आक्रोशाने संपूर्ण परिसर गहिवरून गेला. अपघातानंतर ट्रकचालकाला संतप्त नागरिकांनी चांगला चोप दिला.
काल रात्री दहा वाजताच्या सुमारास साई मंदिरच्या समोर हा भीषण अपघात घडला. अशोक लेलँड कंपनीच्या ट्रकने त्याच दिशेने त्याच्या बाजूने जाणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली. त्यामुळे दुचाकी चालक ट्रकच्या चाकाखाली आला तर त्याची पत्नी दुसऱ्या बाजूला पडली. बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या या युवकाचा काळाच्या रूपात आलेल्या ट्रकने घात केला. अपघातानंतर मृतकाची पत्नी वर्षभराचा चिमुकला आणि मित्राच्या आक्रोशाने अनेकांचे डोळे पानावले. जगदीश महादेव चकोले असे मृतकाचे नाव असून ते मोहाडी तालुक्यातील रहिवासी आहेत.
भंडारा येथील गणेशपुरच्या राजाचे दर्शन करण्याकरिता मोहाडी येथील जगदीश गजानन चकोले ( वय ३६ वर्ष ), त्यांची पत्नी शुभांगी चकोले (वय २७ वर्ष), दोन मुले सार्थक (७ वर्ष) आणि अद्विक चकोले (वय ३ वर्ष ) यांच्यासह काल भंडार येथे आले होते. जगदीश चकोले हे हिडालको कंपनी मौदा येथे चालक या पदावर कार्यरत होते. जगदीशला काल सुट्टी असल्याने पत्नी व दोन्ही मुलासह भंडारा येथील गणपती पाहण्यास ते घरुन सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास निघाले. लहान मुलगा चंद्रभान याची हिरो स्प्लेंडर क्र. एमएच ४० एयु ६१३६ भंडाऱ्याला आले. त्यांच्यासोबत गावातील योगेश माकडे हे सुद्धा त्यांच्या परिवारासह दुचाकीने आले होते.
गणेशपुरच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर हे दोन्ही कुटुंब गावाकडे जाण्यासाठी परत निघाले. रात्री दहा वाजताच्या सुमारास साई मंदिर जिल्हा परिषद ते राजीव गांधी चौककडे जाणा-या मार्गावर अशोक लेलँण्ड कंपनीचा सीजी ०७ बीपी ९६७७ क्रमांकाच्या ट्रकचालकाने भरधाव वेगाने ट्रक चालवीत बाजूने जाणाऱ्या जगदीश यांच्या दुचाकीला मागे होऊन धडक दिली. या अपघातात जगदीश यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातानंतर ट्रक थांबवून चालक खाली उतरला. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली आणि ट्रक चालकाला चोप दिला. मृत जगदीश यांची पत्नी शुभांगी आणि लहान मुलाला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शुभांगी यांचा मोठा मुलगा त्यांच्या मित्राच्या गाडीवर असल्याने तो सुखरूप आहे मात्र लहान मुलगा अद्विक याच्या उजव्या हाताला मार लागल्याने त्याचा हात फ्रॅक्चर झाला आहे. या घटनेमुळे सर्वत्र व्यक्ती केली जात आहे.
मित्रासाठी आक्रोश
मृतक जगदीश यांचा मित्र योगेश याची दुचाकी पुढे होती. तो राजीव गांधी चौकापर्यंत पोहोचताच शुभांगी हिने फोन करून त्यांचा अपघात झाल्याचे सांगितले. योगेश माकडे याने ताबडतोब गाडी वळवून घटनास्थळी आला आणि मित्राला रक्ताच्या थारोळ्यात बघून टाहो फोडला. बेभान झालेला योगेश बराच वेळ मोठमोठ्याने रडत राहिला त्याच्या आकर्षाने अनेकांच्या काळजाचे पाणी झाले.
चूक कोणाची?
सध्या गणपती उत्सवाची धामधूम असून भंडारा येथील गणेशपुरच्या राजाचे आणि इतर गणपतीचे दर्शन घेण्यासाठी ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यामुळे अंतर्गत मार्गांसह महामार्गावरही वाहनांची आणि माणसांची वर्दळ असते. या गर्दीतून वाट काढणे अनेकदा कठीण जाते. त्यामुळे वाहतुकीचे योग्य नियोजन गरजेचे असते. अनेक ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नसल्याने रस्त्यावरही वाहने उभी केली जातात. या अपघातामुळे आता वाहतूक व्यवस्थेवर आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.