बुलढाणा : कुशाग्र बुद्धीला जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमची जोड दिली, तर अगदी सामान्य स्थितीतील विद्यार्थीदेखील मोठे यशोशिखर गाठू शकतात. अगदी खडतर समजली जाणारी सीए (सनदी लेखापाल)ची परीक्षा उत्तीर्ण करण्याचे आव्हानदेखील पेलू शकतता. बुलढाणा जिल्ह्यातील दोन प्रतिभावान विद्यार्थ्यांनी हे सिद्ध करून दाखवले. या दोघांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली. यातील एकाचे वडील ग्रामीण भागात शिंपी (टेलर) असून एकाचे पिता भेळपुरी विक्रीचा व्यवसाय करतात. यंदाच्या सीए परीक्षेत उत्तीर्ण झालेले बहुतेक उमेदवार श्रीमंत घरातील आहे, हे लक्षात घेतले तर या दोघांचे यश ठळकपणे उठून दिसणारे आणि सामान्य स्थितीतील विद्यार्थ्यांना प्रेरणा, ऊर्जा देणारे ठरले आहे.
बुद्धिमत्ताला परिश्रमाची जोड दिली की यश नक्की मिळते, याचा प्रत्यय मेहकर तालुक्यातील अंत्री देशमुख येथील वैभव देशमुखने आणून दिला. वडील शिंपी आणि घरची परिस्थिती तशी जेमतेम. मात्र, वैभवने खडतर परिस्थीतही सीए परीक्षेत उत्कृष्ट यश प्राप्त करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपुढे आदर्श ठेवला. या परीक्षेत एक आणि दोन, असे गट असतात. यामध्ये बहुतांश विद्यार्थी हे एकावेळी कोणत्याही एकाच गटातून उत्तीर्ण होतात. मात्र वैभव हा एकाचवेळी दोन्ही गटातून उत्तीर्ण झाला. आपला मुलगा कर्तुत्वाने मोठा व्हावा, असे प्रत्येक पालकाचे स्वप्न असतेच. मात्र त्या स्वप्नाला सत्यात उतरविण्याचे मोठे काम त्या पाल्यालाच करावे लागते. अंत्री देशमुख या छोट्याशा खेड्यात गजानन देशमुख गेल्या अनेक वर्षांपासून शिंपीकाम करतात. त्यांचा मुलगा वैभवने ग्रामीण भागात शिक्षण घेऊन आपले ध्येय गाठले.
सीए व्हायचे, असे वैभवचे स्वप्न होते.घरची परिस्थिती हालाखीची असतानाही वडिलांनी परिश्रम घेऊन त्याला शिकवले. वैभवनेही आपल्या परिस्थितीची जाण ठेवून जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर हे स्वप्न गाठले. त्याने खर्च व्यवस्थापन लेखा विषयात ६० गुण प्राप्त केले.
नांदुऱ्यात जल्लोष
याच परीक्षेत नांदुरा शहरातील फुटपाथवर पाणीपुरी, भेळ, इत्यादी विक्री करणारे रवींद्र द्वारकादास शर्मा यांचा मुलगा जितेंद्र शर्मादेखील उत्तीर्ण झाला. एका सामान्य पार्श्वभूमीतून आलेल्या जितेंद्रने कधीही परिस्थितीला आपले नशीब ठरवू दिले नाही. रात्रंदिवस दीर्घ अभ्यासाने आणि अथक परिश्रमाने त्याने ही प्रतिष्ठित पदवी मिळवली. याच नांदुरा शहरातील व्यापारी रोशनकुमार डागा यांचा मुलगा साहिल डागा हासुद्धा सीएची परीक्षा उत्तीर्ण झाला. यामुळे नांदुरा नगरीत, शैक्षणिक वर्तुळात जल्लोशाचे वातावरण आहे.
बुलढाणा अर्बनतर्फे सत्कार
या दोघांचा बुलढाणा अर्बनच्या नांदुरा शाखेतर्फे करण्यात आला. जितेंद्र शर्मा याचा सत्कार नांदुरा शाखेचे स्थानिक संचालक संतोष डोडिया यांनी, तर साहिल डागा यांचा सत्कार स्थानिक संचालक मधुसूदन राठी यांनी केला. सत्काराप्रसंगी नांदुरा विभागीय व्यवस्थापक सचिन झंवर, शाखा व्यवस्थापक संदीप माहेश्वरी व कर्मचारी उपस्थित होते.