यवतमाळ : ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घडलेल्या महिला अत्याचाराच्या दोन घटनांनी जिल्हा हादरला आहे. यातील एक घटना बाभुळगाव, तर दुसरी घटना दारव्हा तालुक्यात घडली. बाभुळगाव तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत तिसरीतील विद्यार्थिनीवर तिच्याच वर्गातील विद्यार्थ्याने अत्याचार केला, तर दारव्हा तालुक्यात महिलेवर पाच जणांनी निर्जनस्थळी नेऊन रात्रभर अत्याचार केला.
दारव्हा ते बागवाडी मार्गावर एका ३४ वर्षीय महिलेशी पाच जणांनी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना ३ ऑगस्टच्या मध्यरात्री उघडकीस आली. या प्रकरणी महिलेच्या बहिणीने पोलिसांकडे रविवारी उशिरा दिलेल्या तक्रारीवरून आरोपी संकेत पवार (२६), किशोर सूर्यवंशी (३६), सौरभ कासारदार (२९) सर्व रा. बागवाडी, वेदान्त पोकळे (२६) रा. कुंभारकिन्ही पुनर्वसन, तसेच एका विधिसंघर्ष बालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. विधीसंघर्षग्रस्त बालक वगळता इतर चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
पीडित महिला ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता बागवाडी येथे बहिणीकडे गेली होती. घरी परतत असताना आरोपींनी तिला रस्त्यात अडवून एका लेआऊटवर नेले आणि रात्री ९ वाजल्यापासून पहाटे ४ वाजेपर्यंत तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या घटनेबाबत पीडितेच्या बहिणीने १० ऑगस्ट रोजी दारव्हा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश तारक करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत बाभुळगाव तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत तिसरीतील मुलीवर तिच्याच वर्गतील मुलाने बाथरूम मध्ये नेऊन अत्याचार केला. हे कृत्य करण्यात त्याला एका मुलीनेही त्याला मदत केली. ही घटना १ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी मुलीच्या आईने रविवारी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विधीसंघर्षग्रस्त मुलगा व त्याला मदत करणारी त्याच इयत्तेतील मुलगी अशा दोघांविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. एकाच गावातील एकाच वर्गात शिकणाऱ्या इयत्ता तिसरीतील नऊ वर्षीय मुलाने व मुलीने केल्याचे उघड झाल्यानंतर समाजमन सुन्न झाले.
पीडित बालिकेच्या जनेंद्रियावर जखम दिसल्याने तिने याबाबत विचारणा केली असता, मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. आईने बाभुळगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या संवेदनशील प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी पीडित मुलीच्या जबाबावरून दोन्ही विधीसंघर्षग्रस्त मुलांविरोधात पॉक्सो अन्वयेगुन्हा नोंद केला आहे. दोन्ही विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. मुलाला यवतमाळ येथील बाल निरीक्षण गृहात तर त्याला मदत करणाऱ्या मुलीला अमरावती येथील बाल निरीक्षण गृहात ठेवले आहे. पीडित मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, आता तिची प्रकृती बरी असल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली. या घटनांनी समाजमन ढवळून निघाले आहे.