लोकसत्ता टीम
बुलढाणा : जिल्हा आणि पोलीस विभागाचे मुख्यालय असलेले बुलढाणा शहर आता महिलांसाठी सुरक्षित राहिले नाही, असेच चित्र आहे. गेल्या बारा तासांतच ‘चेन स्नॅचिंग’ अर्थात सोनसाखळी चोरीच्या दोन घटना घडल्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
आज, सोमवारी सकाळी राम मंदिरातून दर्शन घेऊन घरी परत जात असलेल्या एका महिलेला अज्ञात दुचाकीस्वाराने अडवले. एका घराचा पत्ता विचारत त्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडले. तीन तोळ्यांचा दागिना घेऊन तो क्षणात पसार झाला. तारा टावरी असे महिलेचे नाव आहे. चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा…. नागपूर: चालकानेच रडले षडयंत्र, माजी सैनिकाच्या घरी दरोडाप्रकरणी चौघांना अटक
हेही वाचा…. वर्धा जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने पपई, संत्रा, गहू, हरभऱ्याचे मोठे नुकसान; उन्हाळी भाजीपाला मातीमोल
यापूर्वी, रविवारी रात्री ८ वाजतादरम्यान चिखली मार्गावरील गोडे यांच्या निवासस्थानाच्या मागील बोळीत रेखा संदेश तायडे यांच्या गळ्यातील पोत समोरून दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी हिसकावून नेली. तीन तोळ्याच्या पोतचा अर्धा भाग तुटून जमिनीवर पडला.जेमतेम दहा दिवसांपूर्वी चिंचोली चौकात मंजू खोब्रागडे यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना घडली होती. याचा तपास अधांतरी असतानाच दोन महिलांचे दागिने हिसकावण्यात आले आहे. यामुळे सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटनांना प्रतिबंध लावण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी विशेष पथक नेमावे, अशी मागणी होत आहे.