गडचिरोली : खून, जाळपोळ, चकमकीसह स्फोट घडवून सुरक्षा यंत्रणावर हल्ला करणाऱ्या दोन जहाल नक्षलवाद्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना ९ जुलै रोजी यश आले. भामरागड तालुक्यातील धोडराजच्या घनदाट जंगलात अटक केलेल्या या दोन नक्षलवाद्यांवर शासनाचे दहा लाखांचे बक्षीस होते.

नक्षलवादी चळवळीत ॲक्शन टीम कमांडर पदावर काम करणारा रवि मुरा पल्लो (३३,रा. कवंडे ता. भामरागड), भामरागड दलम सदस्य  दोबा काेरके वड्डे (३१,रा. कवंडे ता. भामरागड) अशी त्यांची नावे आहेत. रविवर ८ लाखांचे तर दोबावर महाराष्ट्र शासनाचे दोन लाखांचे बक्षीस होते.

हेही वाचा >>>पाच मित्र…भरधाव कार…इंस्टावर रिल टाकण्यासाठी मोबाईल हातात घेतला अन्…

धोडराज हद्दीतील जंगल परिसरामध्ये विशेष अभियान पथक  जवान नक्षलवादविरोधी अभियान राबवित होते. यावेळी दोन संशयित नक्षलवादी धोडराज ठाणे हद्दीत घातपात करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती मिळाल्यावरुन सापळा रचून जंगलातून त्यांना अटक केली.  नोव्हेंबर २०२३ मध्ये पेनगुंडा येथे एका निरपराध व्यक्तीची हत्या झाली होती. यात त्या दोघांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक नीलोत्पल , अपर अधीक्षक यतीश देशमुख , कुमार चिंता , एम. रमेश, उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.

दोघांवर गंभीर गुन्हे

दोबा वड्डे हा २००८ पासून हस्तक म्हणून नक्षलवाद्यांसाठी काम करायचा. २०१९ मध्ये तो भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती झाला. त्याच्यावर खुनाचे ७, चकमकीचे ५ व इतर ६ असे एकूण १८ गुन्हे नोंद आहेत. २०२२ मध्ये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेलगुंडातील राजेश आत्राम व २०२३ मध्ये पेनगुंडातील दिनेश गावडे या निरपराध व्यक्तींच्या हत्येत त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.  रवि पल्लो हा २०१६ पासून नक्षल चळवळीशी जोडला गेला. २०१८ पासून ॲक्शन समितीत तो सहभागी झाला. पुढे त्यास टीम कमांडर म्हणून बढती मिळाली. त्याच्यावर ६ गुन्हे नोंद असून त्यात चकमक, जाळपोळीसह स्फोटाचे प्रत्येकी एक व खुनाच्या ३ गुन्ह्यांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी जहाल नक्षल नेता गिरीधर याने सपत्नीक आत्मसमर्पण केल्याने नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला आहे. दोन दिवसांपूर्वी धोडराज परिसरात नक्षल्यांनी जवानांवर बॉम्ब हल्ला केला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

मागील काही वर्षांपासून गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या आक्रमक नक्षलविरोधी अभियानामुळे जिल्ह्यात नक्षल चळवळीचे कंबरडे मोडले आहे.