यवतमाळ : नागपूर – तुळजापूर राष्ट्रीय मार्गावर वाहनांची तपासणी करणाऱ्या महामार्ग पोलिसांच्या वाहनाला भरधाव आयशर ट्रकने जोरदार धडक दिली. अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा आणि ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. आर्णी-महागाव दरम्यान कोसदनी घाटामध्ये शनिवारी मध्यरात्री हा भीषण अपघात झाला.
हेही वाचा >>> वर्धा : कलंक कायम ! अवघ्या सहा महिन्यात ४८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
या अपघातात महामार्गावर ड्युटीवर असलेले वाहतूक पोलीस संजय रंगराव नेटके (३०) रा. शिवाजी वॉर्ड, पुसद यांचा आणि आयशर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर यवतमाळ येथे उपचार सुरू आहेत. अपघातानंतर बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी या घटनेची नोंद करत तपास सुरु केला आहे. महामार्ग पोलीस ट्रक थांबवून त्याची कागदपत्रे तपासत होते. त्याचवेळी मागून आलेल्या भरधाव आयशर ट्रकने हायवे पोलिसांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. यावेळी तपासणीसाठी रस्त्यावर उभ्या असलेले पोलीस कर्मचारी संजय नेटके हे तपासणीसाठी थांबलेला ट्रक आणि आयशर यांच्यामध्ये चिरडले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. संजय नेटके हे होमगार्डच्या कोट्यातून पोलीस शिपाई पदापर्यंत पोहोचले होते. त्यांच्या अपघाती मृत्यूने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.