गोंदिया : गोंदिया जिल्हाशेजारील मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट, मंडला आणि शेजारील जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल निर्मूलन मोहिमेत सहभागी जवानांना मोठे यश मिळाले आहे. मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेल्या नक्षलग्रस्त भागात बालाघाट पोलिसांनी दोन नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. मध्यरात्री झालेल्या चकमकीत दोन पोलिसांकडून बक्षीस असलेले दोन नक्षलवादी ठार झाले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. काही भागात आणखी नक्षलवादी असण्याची शक्यता असून तेथे चकमक सुरू आहे.

सोमवारी मध्यरात्री १० ते १२ च्या दरम्यान मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेवरील बालाघाट जवळील केझरी जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. घटनास्थळी शोधमोहीम राबवली जात आहे. मंगळवारी पहाटे पोलिसांना दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. यामध्ये नक्षलवादी नेता डीव्हीसीएम सजंती उर्फ ​​क्रांती, यावर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये २९ लाख रुपयांचे बक्षीस होते. हा अनेक घटनांमध्ये सामील होता आणि नक्षलवादी रघू उर्फ ​​शेर सिंग एसीएम, यावर १४ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर होते. या मृत नक्षलवाद्यांकडून एक एके-४७, एक बारा बोअर रायफल आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू जप्त करण्यात आल्याचे बालाघाटचे जिल्हा पोलीस अधीक्षक समीर सौरभ यांनी सांगितले. या चकमकीत आणखी नक्षलवादी मारले गेल्याचेही त्यांनी सांगितले. या जंगलात अजूनही शोध मोहीम सुरूच आहे.

हेही वाचा – रथातच बसणार… शरद पवारांचा हट्ट अन् नेत्यांची उडाली तारांबळ

हेही वाचा – “महायुती भ्रष्ट उमेदवार देणार की नवीन चेहरा देणार?”, भावना गवळींच्या उमेदवारीवर आदित्य ठाकरेंची टीका; म्हणाले…

हेही वाचा – ‘एप्रिल फुल’ दिवस ‘अच्छे दिन’ म्हणून साजरा; आदित्य ठाकरे यांची भाजपवर टीका

लोकसभा निवडणुकीपूर्वी पोलिसांची कारवाई

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांच्या सीमेवर होणाऱ्या संशयास्पद हालचालींवरही पोलिसांची नजर आहे. दरम्यान, जंगलात काही नक्षलवादी उपस्थित असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली असता त्याना मोठे यश मिळाले. बालाघाट पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये सोमवारी रात्री मध्य प्रदेश आणि छत्तीसगड सीमेवरील डाबरी आणि पिटकोना जवळील केझारी जंगलात चकमक झाली. या चकमकीत दोन नक्षलवादी नेते (एक महिला आणि एक पुरुष) ठार झाले. लोकसभा निवडणुकीपूर्वी पोलीस नक्षलवादाचे कंबरडे मोडण्यात व्यस्त आहेत. बालाघाटचे एसपी समीर सौरभ यांनी या घटनेला दुजोरा देत दोन नक्षलवादी ठार झाल्याचे सांगितले. यामध्ये नक्षलवादी नेता डीव्हीसीएम सजंती उर्फ ​​क्रांती २९ लाखांचे बक्षीस आणि नक्षलवादी रघु उर्फ ​​शेर सिंग एसीएम याच्यावर १४ लाखांचे बक्षीस आहे. पोलिसांनी मंगळवारी सकाळी दोघांचेही मृतदेह बाहेर काढले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.