नागपूर : अतिविषारी क्रेट सापाने दंश केलेल्या अत्यवस्थ पत्नीला घेऊन तिचा पती मेडिकल रुग्णालयात आला. पत्नीवर उपचारही सुरू झाले. काही तासांतच पतीचीही प्रकृती खालावू लागली. त्यालाही सर्पदंश झाल्याचे कळलेच नव्हते. अखेर तो जीवनरक्षण प्रणालीवर गेला. परंतु त्याच्यावरही डॉक्टरांनी उपचार सुरू केले. शेवटी डॉक्टरांच्या प्रयत्नाला यश आल्याने दाम्पत्य बचावले.

पुरण (४५) पती आणि रुखमिणीबाई (४०) पत्नी अशी दोघांची नावे आहेत. दोघेही विटभट्टी कामगार असून कामठी रोडवरील खसाळा नाक्याजवळच्या विटभट्टीवर ते कामावर आहेत. येथेच एका झोपडीत राहतात. ४ जूनला नेहमीप्रमाणे काम झाल्यावर ते झोपडीत परतले. पहाटे २.३० वाजताच्या दरम्यान पत्नी किंचाळल्याने पती दचकून उठला. त्यांच्या खोलीत साप होता. पत्नीला साप चावल्याने तिची प्रकृती खालवू लागली. पतीने तातडीने मेडिकलचा आकस्मिक विभाग गाठला. डॉक्टरांकडून उपचाराला सुरुवात झाली. पतीने साप बघितला असल्याने तो क्रेट जातीचा अतिविषारी असल्याचे स्पष्ट झाले. दोघेही शेजारी झोपले असल्याने डॉक्टरांनी पतीलाही साप चावला का, अशी विचारणा केली. परंतु त्याने नाही म्हटले. पहाटे ५ वाजताच्या सुमारास पतीलाही छातीत दुखायला लागले.

हेही वाचा – नागपूर: राजकीय जुगलबंदी रंगणार! देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे नागपुरात एका मंचावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉक्टरांनी ईसीजी काढून घेतला. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. प्रकृती जास्तच खालावल्यावर त्याला जीवनरक्षण प्रणालीवर (व्हेंटिलेटर) ठेवले व अंदाजानुसार सर्पदंशानंतरचे उपचार सुरू केले. शेवटी उपचाराला यश मिळाले. सुमारे ३२ तासांनी पती-पत्नी दोघेही बरे झाले. मेडिकलच्या औषधशास्त्र विभागाचे डॉ. मिलिंद व्यवहारे, डॉ. प्रवीण शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. आशीष, डॉ. रामकिशन, डॉ. अस्मिता, डॉ. श्रुतिका, डॉ. भाग्यश्री, डॉ. रुषिकेश, डॉ. पंकज आणि डॉ. हरीश यांनी परिश्रम घेतले.