बुलढाणा: दोन दुचाक्यांची समोरासमोर धडक घेवून दोन  युवक जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली. खामगाव तालुक्यातील लाखनवाडा – आंबेटाकळी मार्गावर काल रविवारी रात्री  उशिरा ही भीषण दुर्घटना घडली.

या दुर्दैवी घटनेत दगावलेले दोन्ही युवक एकाच गावातील म्हणजे लाखनवाडा ( तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा)  येथील रहिवासी होते. त्यांच्या अकाली मृत्युमुळे दोन महिलांचे कुंकू पुसल्या गेले असून दोघा चिमुकल्यांचे पितृछत्र हरविले. यामुळे  लाखनवाडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातग्रस्त युवकांच्या परिवारावर दुख्खाचा डोंगर कोसळला आहे.

योगेश ज्ञानेश्वर जावळे ( वय ३०वर्षे) , गणेश श्रीराम पांढरे (वय ३९ वर्षे )  अशी मृतांची नावे असून दोघेही लाखनवाडा तालुका खामगाव येथील रहिवासी होत. यातील योगेश जावळे हा त्याच्या सासरवाडी वरून महान पिंजर (जिल्हा अकोला ) येथून रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान आपले मूळ गाव लाखनवाडा कडे आपल्या दुचाकी ने येत होता. गणेश पांढरे हा कामानिमित्ताने लाखनवाडा येथून आंबेटाकळी( तालुका खामगाव)कडे   दुचाकीने जात होता. यावेळी दोघांच्या दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने दोन्ही दुचाकीची समोरासमोर भरवेगात धडक झाली.   धडक इतक्या जोराची होती की दोघेही युवक जागीच ठार झाले आहेत.

 दोघेही विवाहित असून योगेश जावळे याला एक वर्षाची लहान मुलगी आहे.गणेश पांढरे याला  एक मुलगा,  एक मुलगी आहे.या दोघांच्या निधनामुळे लाखनवाडा गावावर शोककळा पसरली आहे.