Uddhav Thackeray meet Devendra Fadnavis शपथविधीनंतर महायुतीच्या आमदारांमध्ये उफाळलेली नाराजी, लांबलेले खाते वाटप, संख्याबळ कमी असल्याने विरोधकांचा कमी झालेला आवाज यामुळे त्राण हरपलेल्या अधिवेशनात दुसऱ्या दिवशी हलचल वाढली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गैरहजेरी, शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विधानभवनात आगमन आणि त्यांनी घेतलेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट यामुळे अधिवेशनाचा नूरच पालटला.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी पक्षाचा उत्साह मावळलेला दिसला. मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने नाराज झालेल्या महायुतीतील सर्वच घटक पक्षांतील नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त करणे सुरू केले. त्याची छाया अधिवेशनावर दिसू लागली. दणदणीत बहुमत असूनही सत्ताधारी पहिल्या दिवशी बॅकफूटवर दिसून आले.

हेही वाचा – अन्य धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांवर सरकारचे नियंत्रण?

अधिवेशनाचा दुसरा दिवस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अधिवेशनातील गैरहजेरीच्या चर्चेने गाजला. खातेवाटप न झाल्याने मंत्री होऊनही कामे नसल्याने नवनिर्वाचित आमदारांच्या देहबोलीतून नाराजी दिसून येत होती. विधान भवनाच्या पायऱ्यांवरील आंदोलन व बीड आणि परभणीचा मुद्दा विरोधकांनी लावून धरण्याचा प्रयत्न करूनही अधिवेशनातील मरगळ काही दूर झाली नाही.

हेही वाचा – रेशीमबागेतील बौद्धिकाला अजित पवार जाणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पवार, शिंदेंच्या दिल्लीवारीचा कयास

दुपारच्या संत्रानंतर उद्धव ठाकरे यांचे विधानभवनात आगमन होताच विधानभवन परिसरातील नूर पालटला. पत्रकार परिषदेत महायुतीवर टीका केल्यावर त्यांनी थेट मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने दिवसभर हाच मुद्दा विधानभवनात चर्चेत होता. या भेटीने अनेक चर्चेला जन्म दिला असून त्यावर वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, अजित पवार नेमके गेले कोठे अशी विचारणा सत्ताधारी व विरोधी पक्षाचे आमदार परस्परांना करताना दिसून आले. एकनाथ शिंदे दुपारी विधान परिषदेत होते. मात्र तेही दिल्लीत गेल्याची चर्चा होती. पण त्यांच्या उपस्थितीने त्याला पूर्णविराम मिळाला.