चंद्रपुरात फोडला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर : शौर्य व विरतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांनी केवळ मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात यश मिळावे यासाठी नड्डा यांनी न्यू इंग्लिश हायस्कूलच्या क्रीडांगणावर ‘विजय संकल्प’ जाहीर सभेच्या माध्यमातून प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी ते बोलत होते.

मंचावर वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यपालन मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष  हंसराज अहिर, खासदार अशोक नेते, खा. रामदास तडस, आमदार संजीव रेड्डी, आ.डॉ.रामदास आंबटकर व आ. बंटी भंगाडिया, ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगर अध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे उपस्थित होते.

हेही वाचा >>> परंपरेत खंड, पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय विज्ञान काँग्रेसला येणार नाही, कारण..

नड्डा म्हणाले, महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव सेना, काँग्रेस व राष्ट्रवादी अशी भ्रष्टाचाराची तीन दुकाने उघडली. सत्तेसाठी विचारांशी तडजोड करणाऱ्या अशा लोकांना माफी नाही. राजकारणात सत्याचा नेहमीच विजय होतो. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस समोर माथा टेकता टेकता  ठाकरे यांचा माथाच झुकला आहे. भाजपने जनाधार, जनधन, आधार व मोबाईल असा एकत्रित जॅम केला.  तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने मात्र ज्वाईन्टली एक्वायर मनी अशा पध्दतीने केवळ पैसा ओरबाडण्याचे काम केले. याच भ्रष्टाचारामुळे राज्यातील दोन मंत्री कारागृहात गेले. त्यातील एक माजी मंत्री नुकतेच कारागृहातून सुटून बाहेर आले तर एक कारागृहात अजूनही शिक्षा भोगत आहेत.

हेही वाचा >>> नागपूर : खळबळजनक! आमदार निवासात साफसफाई करताना आढळल्या दारूच्या बाटल्या..

काँग्रेसच्या काळात मेंदूज्वर, पोलिओ, जापनीज ताप यावर लस येण्यास अनेक वर्ष गेली. मात्र करोना संकटात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अवघ्या नऊ महिन्यात भारतात दोन करोना लसींची निर्मिती केली. कधीकाळी मोबाईल आयात करावे लागत होते. आज ९७ टक्के मोबाईलचे उत्पादन भारतात होते. प्रधानमंत्र्यांच्या पाच किलो गहू, तांदूळ, दाळ या मोफत धान्य योजनेचा लाभ ८० कोटी नागरिकांना होत आहे.  परिणामी, भारतात अतिगरीबी एक टक्क्यापेक्षा अधिकने कमी झाली आहे. याप्रसंगी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष,माजी केंद्रीयमंत्री हंसराज अहिर यांचीही भाषणे झाली. संचालन ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी तर आभार डॉ. मंगेश गुलवाडे यांनी मानले.

मोदींनी युक्रेन युध्द थांबविले

युक्रेन युध्द सुरू असताना पंतप्रधान मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी बोलून युक्रेन युध्द थांबविले होते. त्यानंतर भारतातील ३२ हजार विद्यार्थ्यांना युध्द भूमितून भारतात आणले. जोवर विद्यार्थी भारतात परतले नाही तोवर युध्द थांबवून ठेवले. अमेरिका, ब्रिटेन, पाकिस्तान यांनाही जे करता आले नाही ते मोदींनी केल्याचे नड्डा म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray stabbed the bjp in the back for the post of chief minister nagpur news rsj 74 ysh
First published on: 02-01-2023 at 17:04 IST