बुलढाणा : दस्तूरखूद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेला हिंदू ह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी द्रूतगती महामार्ग हा प्रारंभीपासून वादग्रस्त ठरला आहे. नियमित अंतराने होणारे लहान मोठे अपघात ही नित्याची बाब ठरली.बुलढाणा जिल्ह्यातील चार तालुक्यातून जाणाऱ्या या महामार्गावर तब्बल २५ निरपराध प्रवाशांचे बळी घेणारा अपघात राज्यात वादळ उठवणारा ठरला.
रस्त्याची नादुरुस्ती, अधूनमधून होणारी टोल नाका कर्मचाऱ्यांची आंदोलने, वाढती गुन्हेगारी, डिझेल चोरीचे वाढते प्रकार अश्या नाना विषया मुळे समृद्धी वादाचा विषय ठरला आहे. आता यात भर पडली आहे ती समृद्धी महामार्गा खाली तयार करण्यात आलेल्या ‘अंडरपास’ मार्गांची! समृद्धी महामार्गांवर कमिअधिक अडीच तीन किलोमीटर अंतरावर तयार करण्यात आलेले हे अंडरपास समृद्धी ला लागून असलेल्या किंवा परिसरातील हजारो शेतकऱ्यासाठी अडचणीनीची बाब ठरली आहे. सुविधा ऐवजी मोठी डोकेदुखी ठरली आहे. पावसाळ्याच्या चार (पाच) महिन्यात हे अंडर पास शेतकऱ्यांसाठी अडथळ्याची शर्यत ठरते.
शेतकऱ्यांसाठी समृद्धी
महामार्गाखालून बनविण्यात आलेल्या अंडरपासची वाट पावसाने बिकट झाली आहे. यंदाचा पावसाळा देखील याला अपवाद नाहीये. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर, लोणार, देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा बया तालुक्यातून समृद्धी महामार्ग जातो. यंदा तर लोणार, मेहकर या तालुक्यात वेळोवेळी अतिवृष्टी वा ढगफुटी सदृश्य पावसाने हजेरी लावली आहे. देऊळगाव राजा आणि सिंदखेड राजा तालुक्यात धोधो पाऊस बरसला आहे. यापरिणामी समृद्धी महामार्ग खालील रस्त्यांवर (अंडर पास मध्ये) चिखल साचल्याने शेतकऱ्यांना शेतात जाणे कठीण झाले आहे. समृद्धी महामार्गाच्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावर बनविलेले हे अंडरपास डोकेदुखी ठरले आहेत. शासनाची समृद्धी वाढविणारा, वाहनधारकांच्या सोयीचा असलेला हा मार्ग शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरल्याची ओरड होत आहे.
डोणगाव शिवारातील अंजनी बुद्रूकसह जिल्ह्यातून गेलेल्या समृद्धी महामार्गावर विविध ठिकाणच्या अंडरपासची अशीच स्थिती आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतांमध्ये जाण्यासाठी पूर्वी पांदण रस्ते होते. मात्र समृद्धी महामार्गामुळे रस्ते बंद झाले. या भागातून पलिकडच्या दिशेने जाताना शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी अंडरपास रस्ते बनविण्यात आले. सर्व्हिस रस्ते तयार करण्यात आले.
महामार्गाचे काम सुरू झाले तेव्हा वहिवाट रस्ते नामशेष झाले, तर दुसरीकडे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेले नैसर्गिक मार्ग बंद झाले. यामुळे समृद्धी महामार्गावर पडणारे पावसाचे पाणी शेतांमध्ये शिरत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे. शेतीमधील गाळ पाण्यासोबत वाहून अंडरपास रस्त्यावर गुडघाभर चिखल साचला आहे. या बोगद्याखाली दिवसा अंधार पसरलेला असतो.
सध्या चिखलामुळे ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, ट्रॅक्टरवरील फवारणी यंत्र नेता येत नाही. चिखल, पाण्यातून कशीबशी वाट काढावी लागत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांशी मार्ग असलेल्या जमिनीवरून कैक फुटावर बांधण्यात आलेल्या समृद्धी महामार्गची शासन अन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महा मंडळाला काळजी, आस्था आहे. मात्र शेतकऱ्याप्रमाणेच या अंडर पास शी काही ‘देणेघेणे’ अथवा सोयर सुतक नाही असेच सध्याचे विदारक चित्र आहे…ही अडचण शासनाने सोडवावी, अशी मागणी जोर धरत आहे.