नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी आपण बॉम्ब फोडू, असे जाहीर करून राजकीय वातावरण तापवणारे सेनेचे (ठाकरे गट) प्रवक्ते संजय राऊत यांनी दिवसभरात कोणताही बॉम्ब फोडलाच नाही. त्यामुळे विधिमंडळ परिसरात त्यांच्या न फुटलेल्या ‘बॉम्ब’चीच चर्चा होती. राऊत यांचा बॉम्ब फुसका तर निघाला नाही ना? अशी विचारणा शिंदे-भाजप गटाचे आमदार परस्परांना करीत होते.

हिवाळी अधिवेशनासाठी रविवारी रात्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व प्रवक्ते खासदार संजय राऊत यांचे आगमन झाले. त्यापूर्वी ठाण्यात बोलताना राऊत यांनी नागपुरात बॉम्बस्फोट घडवू , असे सांगितले होते. त्यामुळे सोमवारी दिवसभर राऊत यांच्या या ‘बॉम्ब’चीच चर्चा होती. त्यांचा बॉम्बस्फोटात कोण घायाळ होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

हेही वाचा: स्मृती मंदिर भेटीप्रसंगी काय म्हणाले फडणवीस? सीमावाद, सत्तार आणि बरेच काही…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरे विधान भवनात आले तेव्हा आणि त्यांनी विधान परिषदेत सीमा प्रश्नी भूमिका मांडल्यावर माध्यमांशी संवाद साधताना त्यांच्यासोबत राऊत होते. मात्र, यावेळी ते काहीच बोलले नाही. त्यामुळे माध्यम प्रतिनिधींनी उद्धव यांनाच याबाबत विचारणा केली. ‘आमच्याकडे बरेच बॉम्ब आहेत, त्यांच्या वाती काढल्या आहेत, फक्त पेटवण्याचा अवकाश आहे’ असे सांगून ठाकरे यांनी बॉम्ब पेटवणार कधी हा प्रश्न अनुत्तरित ठेवला. दरम्यान, शिंदे-भाजप सरकारमधील मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारीच राऊत यांचा ‘बॉम्ब’ फुसका असल्याचे सांगितले होते. त्याचे भाकित पहिल्या दिवशी तरी खरे ठरले.