लोकसत्ता टीम

नागपूर: शहरात चोवीस बाय सात पाणी पुरवठा योजना राबविताना ज्या कंपनीला (ऑरेंज सिटी वॉटर वर्क्स) आपण पैसे देत आहोत तिच्या त्याच्या विरोधात कठोर भूमिका घ्या, ज्या भागात पाणी आहे तिथे टँकर बंद करा, टँकर टोळीची मक्तेदारी मोडून काढा असे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.

अमृत योजनेतंर्गत दाभा व गिट्टीखदान येथे बांधण्यात आलेल्या जलकुंभाच्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. शनिवारी आयोजित या कार्यक्रमाला काँग्रेसचे शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, भाजपचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके उपस्थित होते.

यावेळी गडकरी म्हणाले, चोवीस बाय सात पाणी पुरवठा योजना नागपूर वगळता भारतात अन्य शहरात यशस्वी होऊ शकली नाही. आज ५० टक्के शहरात २४ तास पाणी पुरवठा होत असताना अनेक भागात टँकरची गरज नाही. महापालिकेत असलेले टँकर चालक कोण आहेत, कोणाशी संबंधित आहेत याची माहिती आहे. कोणीही नेता आला तरी ज्या भागात पाणी आहे तिथे टँकर देऊ नका. पूर्वी पाण्याची समस्या असताना आम्हीच महापालिकेत मडके फोडून आंदोलन केले. मात्र आज तशी परिस्थिती नाही. पाण्यासाठी मोर्चे निघत नाही. जिथे कमिशन मिळते तिथे टँकर सुरू केले जातात. हे टँकर कोणाच्या मालकीचे आहेत त्याची माहिती माझ्याकडे आहे. टँकरमधील कमिशन बंद करुन प्रत्येकाच्या घरात नळ कसे देता येईल अशी व्यवस्था निर्माण करा आणि शहर टँकर मुक्त करा असे आवाहन त्यांनी केले.