नागपूर: शिक्षण विभागात भ्रष्टाचार पसरला आहे, अधिकारी मालपाणी (पैसे) मागतात आणि नंतर तुरुंगात जातात, असे परखत मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
नागपूर सहोदया स्कूल कॉम्प्लेक्स या संस्थेतर्फे बेसा येथील पलोटी स्कूलमध्ये शनिवारी आयोजित प्रादेशिक प्राचार्य परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी फादर जोसेफ, संस्थेच्या अध्यक्ष भारती बिजवे, सचिव वंदना बिसेन, दि साऊथ पब्लिक स्कूलच्या प्राचार्य डॉ. मृणालिनी दस्तुरे उपस्थित होत्या. गडकरी पुढे म्हणाले, शिक्षण विभागात शिक्षकांच्या नियुक्तीसाठी लाच द्यावी लागते. शिक्षण विभागाचे अधिकारी जे काही करतात ते मला माहिती आहे. प्रथम ते पैसे मागतात आणि नंतर तेच अधिकारी तुरुंगात जातात.
लोक मला अनेकदा विचारतात की इतक्या भ्रष्ट व्यवस्थेत रस्ते कसे बांधले जातात? तेव्हा सांगतो की काही लोक समस्यांना संधींमध्ये बदलतात आणि काही लोक संधींना समस्यांमध्ये बदलतात. अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्यांची जाणीव करण्याच्या मुद्यावर गडकरी म्हणाले, जेव्हा तुम्हाला नोकरी मिळते तेव्हा तुमची परीक्षा असते. मी विचारतो की, तुम्ही गाढवाला घोडा बनवू शकता की नाही? असे म्हणू नका की हे गाढव आहे, ते सुधारता येत नाही. ते सुधारता येत नाही, म्हणूनच तर तुम्हाला बोलावण्यात आले आहे.
प्राचार्यपद म्हणजे नेतृत्वाची परीक्षा
प्राचार्यपद म्हणजे नेतृत्वाची परीक्षा आहे. उत्तम शिक्षण देणारे शिक्षक आपल्या संस्थेत असावेत आणि सामूहिक प्रयत्नांतून उत्तम विद्यार्थी घडावेत, ही जबाबदारी प्राचार्यांवर असते. चांगली पिढी घडविण्यासाठी शिक्षण हे सर्वोत्तम साधन आहे. त्यामुळे आज शिक्षणावर होत असलेली गुंतवणूक भविष्यातील भारत घडविण्यासाठी आहे. आज तुम्ही काय शिकवणार त्यावर सारे काही अवलंबून आहे.
कुठल्याही क्षेत्रात नेमके कौशल्य अत्यंत महत्त्वाचे आहे. पण ते एका दिवसातील काम नाही. ती एक प्रक्रिया आहे. चांगले कौशल्य आणि गुणवत्तेवर कुणाचे स्वामित्व हक्क नाही. जीवनमूल्य बाजारात विकत मिळत नाहीत. त्यामुळे उद्याचा सुसंस्कृत माणूस घडविण्यासाठी मूल्याधिष्ठित शिक्षणावर भर द्यावा लागेल. प्रामाणिकपणा, विश्वासार्हता, सहकार्य, समन्वय आणि गुणवत्ता या सूत्रांचा अवलंब देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. सुसंस्कारित पिढी घडविण्याची जबाबदारी प्राचार्यांवर असल्याचेही गडकरी म्हणाले.