वाशिम : विदर्भात रविवारी अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार दुपारनंतर जिल्ह्यात अचानक वातावरणात बदल झाल्याने कुठे हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मंगरुळपीर तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अंदाजे शंभर एकरावरील बीजवाई कांदा भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.

रविवारी दुपारी अचानक वातावरणात बदल झाला. ढग दाटून आले. दुपारनंतर जिल्ह्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. कुठे हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला तर मंगरुळपीर तालुक्यातील शेलू बाजार, तराळा, तपोवन भागात जोरदार पाऊस झाला. सध्या शेतात कांदा, बीजवाई कांदा व इतर पिकांची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. बहुतांश ठिकाणी फुलावर आलेला बीजवाई कांदा अवकाळी पावसामुळे आडवा झाला तसेच इतर पिकांचेदेखील अतोनात नुकसान झाल्याने पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला आहे.

हेही वाचा…राष्ट्रवादी की भाजप; महायुतीतील गडचिरोलीचा तिढा सुटेना, सोमवारी नावे जाहीर होण्याची शक्यता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्ह्यातील कारंजा व मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार, शिवनी, वनोजा, पेडगाव परिसरात फेब्रुवारीमध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाली होती. यामध्ये गहू, हरभरा, संत्रा फळबागेचे प्रचंड नुकसान झाले होते. वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे पक्षीसुद्धा मोठ्या प्रमाणावर दगावले होते. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे त्वरित करून शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात आली. या संकटातून सावरून शेतकऱ्यांनी नव्याने कांदा, बीजवाई कांद्याची लागवड केली. मात्र, पुन्हा एकदा काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हताश झालेला आहे.