अकोला : उन्हाचा पारा प्रचंड प्रमाणात चढत असतांनाच जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. शहरासह जिल्ह्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह तुरळक स्वरूपाचा अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे उकाड्यापासून अंशत: दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस सतर्कतेचा इशारा दिला असून विजाच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली. उष्णतेच्या झळांनी नागरिक हैराण झाले. विदर्भातील बहुतांश शहरांमधील तापमानाचा पारा चढला आहे. अनेक जिल्ह्यातील तापमानाने ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला. मध्यंतरी ढगाळ वातावरणामुळे तापमानात अंशत: घट झाली होती. आता पुन्हा एकदा ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

दरवर्षी उन्हाळ्यामध्ये अकोल्यात तापमानाचे विक्रम रचले जातात. ती परंपरा यंदाही कायम आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील तापमानात मोठी वाढ झाली. शहरातील या वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही लाही होत असून घामाच्या धारा लागत असतांना गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला. बुधवारी शहरासह जिल्ह्यातील विविध भागामध्ये वादळी वारा सुटला होता. काही वेळातच पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे तापमानात काही अंशी घट झाली आहे.

भारतीय हवामान खात्याचा अंदाजानुसार अकोला जिल्ह्यात ७ ते ९ मेदरम्यान विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला. जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील या वातावरणात आवश्यक ते कारण असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, जनावरांना झाडांना किंवा विजेच्या वायरीच्या खाली बांधू नये, दामिनी ॲपचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दामिनी ॲपवर वीज पडण्याची सूचना मिळणार

दामिनी ॲपवर सात मिनिटे, १४ मिनिटे आणि २१ मिनिटे आधी वीज पडण्याची सूचना आपल्याला देण्यात येते. त्या सूचना पाहून आपण स्वतःचा व इतरांचा जीव वाचवण्यासाठी या ॲपचा वापर करू शकता. हे ॲप पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालय भारत सरकार यांच्यामार्फत विकसित करण्यात आलेले आहे. गूगल प्ले स्टोरवरुन ॲप डाउनलोड करता येते, या दरम्यान सर्व यंत्रणानी दक्षता घ्यावी, असे आवाहन अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केले आहे.