नागपूर : बुधवारची सकाळ वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील हमदापूर वासियांसाठी आश्चर्याची ठरली. आकाशातून भलामोठा बर्फसदृष्य गोळा पडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. अवघे गाव तो बर्फाचा गोळा पाहण्यासाठी जमा झाले. दिवसभर हा गोंधळ थांबलाच नाही. कुणी म्हणाले ती दोन किलो वजनाची गार आहे, कुणी चार किलो तर कुणी म्हणाले ती आठ किलो वजनाची गार आहे. हमदापूर येथील अंबादास वासनिक यांच्या शेतात तीन ते चार किलोची गार पडली. त्यापाठोपाठ गावात आणि शिवारातही मोठ्या आकाराच्या गारा पडल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे भीती आणि कुतूहलमिश्रीत प्रतिक्रिया गावकऱ्यांकडून आल्या आणि चर्चेला पेव फुटले.

बुधवारी मुसळधार पावसाचा मारा सुरू असतानाच वासनिक यांच्या शेतातील गोठ्यासमोर मोठा बर्फसदृष्य गोळा पडल्याचे वासनिक यांच्या मुलीला दिसले. त्यानंतर गावकऱ्यांचे लोंढे त्यांच्या शेताकडे आले. ही बाब आकाश निरीक्षण मंडळ विदर्भाचे अध्यक्ष पंकज वंजारे यांना कळली. गुरुवारी ते घटनास्थळी पोहोचले आणि त्याचवेळी त्यांना हा काहीतरी वेगळाच प्रकार असल्याचे लक्षात आले. आकाशातून मोठ्या आकाराची अशा प्रकारे गार पडण्याचे प्रकार क्वचित घडतात. त्याला ‘मेगाक्रायोमीटिअर’ असे म्हणतात. मात्र, त्याकरिता लागणारी पोषक भौगोलिक परिस्थिती या घटनेच्या वेळी वर्धा जिल्ह्यात नव्हतीच.

राहिला दुसरा प्रकार, त्यास विमानाचा बर्फ जमिनीवर कोसळणे म्हणजेच ‘ब्ल्यू आईस’ पडणे. मोठी गार किंवा ‘ब्ल्यू आईस’ हे दोन्ही प्रकार येथील घटनेत घडले नाही. कारण दोन्ही प्रकारात गार किंवा मोठ्या आकाराचा बर्फ पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षण शक्तीने जमिनीकडे खेचला जात प्रचंड वेगाने तो जमिनीकडे येईल. शिवाय जमिनीवर धडकल्यावर खोल खड्डा होणे किंवा त्याचे थोडे तरी तुकडे होणे अपेक्षित आहे. या प्रकरणात तसे न होता तेथे फक्त एक सेंटीमीटर पेक्षाही कमी खोलीचा खड्डा आढळून आला. शिवाय जमिनीवर कोसळलेल्या बर्फाचा तुकडेपण झाले नसल्याचे ज्यांनी बर्फाचा तुकडा बघितला त्यापैकी काहींशी संवाद साधत्यावर नागरिकांनी सांगितले. हा बर्फाचा गोळा सहा इंच व्यासाचा होता, हे प्राथमिक चौकशीत सिद्ध झाले.

मोठी गार पडल्याचा दावा करत वायरल झालेल्या व्हिडीओतील त्या कथीत गारीचे निरीक्षण केल्यावर तिचा आकार नैसर्गिक गारीप्रमाणे दिसत नाही. सुमारे एक तास घटनास्थळाचे आणि ज्यांनी ज्यांनी ही गार बघितली त्यापैकी काहीशी संवाद साधल्यानंतर ही गार आकाशातून पडलीच नाही असा निष्कर्ष निघत असल्याचे आकाश निरीक्षण मंडळ विदर्भाचे अध्यक्ष पंकज वंजारे यांनी सांगितले.