नागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (युपीएससी) घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेच्या प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्यासाठी आयोगाने एक अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयात एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान युपीएससीने याबाबत माहिती दिली. युपीएससी पूर्वपरीक्षेच्या उत्तरतालिकेबाबत हा निर्णय आहे. युपीएससीच्या या निर्णयामुळे परीक्षा पद्धतीत मोठा बदल होणार आहेत.

याचिकेप्रमाणे, युपीएससी उत्तरतालिका, गुण आणि कट-ऑफ मार्क्स संपूर्ण परीक्षेचा निकाल लागेपर्यंत उघड करत नाही. सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा ही जवळपास एक वर्ष चालते, त्यामुळे पूर्व परीक्षेत अपात्र ठरलेले विद्यार्थ्यांना आपल्या कामगिरीबद्दल काहीच माहिती मिळत नाही. त्यामुळे अनेक उमेदवार संपूर्णपणे अंधारात राहतात, आपली निवड का झाली नाही हे समजत नाही. याचिकेत २०२१ चा संदर्भ देण्यात आला आहे, जिथे उशिराने प्रसिद्ध झालेल्या उत्तरतालिकेत चुका आढळल्या, आणि काही अपात्र ठरवले गेलेले उमेदवार प्रत्यक्षात योग्य उत्तर देणारे होते. यामुळे युपीएससीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. उत्तरतालिका जाणीवपूर्वक उशिरा प्रसिद्ध केली जाते, जेणेकरून हरकती निष्फळ ठराव्यात. २०२२ मधील पूर्व परीक्षेची उत्तरतालिका देखील याचिका दाखल होईपर्यंत प्रसिद्ध झालेली नव्हती. ही पद्धत पारदर्शकतेच्या विरोधात असल्याचा आणि योग्य उमेदवारांचा अन्याय होत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला.

नवा निर्णय काय?

यापुढे पूर्वपरीक्षा झाल्यानंतर लगेच उत्तरतालिका (आन्सर की) प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याआधी ही उत्तरतालिका संपूर्ण परीक्षा प्रक्रिया (पूर्व, मुख्य आणि मुलाखत) पूर्ण झाल्यानंतरच प्रसिद्ध केली जात होती. या संदर्भात २०२४ मध्ये दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेच्या उत्तरात युपीएससीने २० सप्टेंबर रोजी प्रतिज्ञापत्रदाखल करत ही माहिती दिली आहे. या याचिकेत परीक्षेच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्याची मागणी करण्यात आली होती. याच प्रकरणात न्यायालयाने वरिष्ठ वकील जयदीप गुप्ता यांना न्यायालयीन मित्र म्हणून नेमले होते. त्यांनी पूर्व परीक्षेनंतर दुसऱ्या दिवशीच उत्तरतालिका प्रसिद्ध करावी, असा प्रस्ताव मांडला होता. मात्र, १५ मे रोजी युपीएससीने याला विरोध केला होता, आणि असे केल्यास गोंधळ निर्माण होईल आणि परीक्षेच्या अंतिम निकालामध्ये उशीर होईल असे मत मांडले होते. मात्र, २० सप्टेंबर रोजी युपीएससीने आपली भूमिका बदलत नवीन निर्णयाची घोषणा केली.

नवीन निर्णयानुसार प्रक्रिया कशी असेल?

पूर्व परीक्षा झाल्यानंतर तात्पुरती उत्तरतालिका प्रसिद्ध केली जाईल. परीक्षार्थींना यावर आक्षेप नोंदवण्याची संधी दिली जाईल. प्रत्येक हरकतीसोबत किमान तीन अधिकृत संदर्भ स्रोत द्यावे लागतील. या हरकती विषयतज्ज्ञांच्या समितीकडे पाठवण्यात येतील. तज्ज्ञ अंतिम उत्तरतालिका निश्चित करतील, आणि त्यावर आधारित निकाल लागेल. शेवटी अंतिम उत्तरतालिका पूर्ण निकालानंतर प्रसिद्ध केली जाईल. युपीएससीने सांगितले की, हा जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे आणि तो लवकरात लवकर लागू केला जाईल. यामुळे याचिकाकर्त्यांनी मांडलेल्या तक्रारींवर प्रभावी उपाय होईल असे आयोगाने नमूद केले. याप्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबर रोजी न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती ए. एस. चंदूरकर यांच्या खंडपीठासमोर होणार आहे.