गडचिरोली : नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीत काही उमेदवारांनी प्रकल्पग्रस्तांचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यानंतर बनावट क्रीडा प्रमाणपत्राच्या माध्यमातूनदेखील लाभ घेतल्याची माहिती आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेकडून निवड झालेल्या १५ पोलिसांच्या प्रमाणपत्रांची चौकशी सुरू केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

जिल्हा पोलीस दलातच चार महिन्यांपूर्वीच भरती प्रक्रिया राबविण्यात आली. एकूण ३४८ जागांसाठीच्या या भरतीत काही उमेदवारांनी प्रकल्पग्रस्तांच्या कोट्यातून नियुक्ती मिळवली होती. मात्र, हे उमेदवार व त्यांचे कुटुंबीय वर्षानुवर्षे गडचिरोलीचे रहिवासी असताना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मात्र बीड येथील असल्याने ते नियमबाह्य असल्याचा दावा एका निनावी पत्राद्वारे केला होता.

हेही वाचा – नागपूर : कोराडीतील प्रस्तावित वीज प्रकल्पाविरुद्ध मुंडन, जय विदर्भ पार्टी आक्रमक

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना हे निनावी पत्र प्राप्त झाले होते. या पत्राआधारे चौकशी केली असता बनावट प्रमाणपत्र देत नोकरीचा लाभ घेतल्याच्या आरोपावरून दोन नवनियुक्त पोलिसांसह प्रतीक्षेतील एकास अटक झाली होती. त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी बनावट प्रमाणपत्र सादर करून भरती झालेल्या उमेदवारांचे तसेच हे प्रमाणपत्र मिळवून देणाऱ्या रॅकेटमधील लोकांचे अटकसत्र राबविले होते.

हेही वाचा – राजा हिंदुत्ववादी असणे ही काळाची गरज, अभिनेते शरद पोक्षे यांचे मत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता बनावट क्रीडा प्रमाणपत्र देऊन पोलीस दलात भरती झालेले उमेदवारदेखील चौकशीच्या रडारवर आले आहेत, बनावट क्रीडा प्रमाणपत्र देऊन त्यांनी खेळाडू कोट्यातून भरतीचा लाभ घेतल्याची शंका आहे. त्यानुषंगाने गुन्हे शाखेमार्फत चौकशी सुरू आहे. याबाबत पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना संपर्क केला असता त्यांनी यास दुजोरा दिला. चौकशी पूर्ण झाल्यावर यातील तथ्य समोर येईल, असे त्यांनी सांगितले.