वर्धा : गुप्तधन, दैवी शक्ती, जादूटोणा अशा अंधश्रद्धा व त्यासाठी प्राण्यांचा वापर होत असल्याचे दिसून आल्याने खळबळ उडाली. मात्र आता त्यापेक्षा धक्कादायक व अघोरी म्हणावी अशी बाब समोर आली आहे. वन खात्याने वाघाचे कातडे, खवले मांजर व मांडूळ साप जप्त केले. सोबतच १० वेगवेगळ्या टोळीचे आरोपी पकडले. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मोबाईलमध्ये आश्चर्यकारक बाबी दिसल्या. वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला व वाशीम जिल्ह्यातील काहींचे मोबाईल नंबर आढळले. त्यात बुवाबाजी करणारे पण आहेत. वर्धा जिल्ह्यात प्रामुख्याने प्राणी तस्करी करणारे दिसून आले. सर्वात गंभीर म्हणजे काही महिला व मुलींचे फोटो पण त्यात सापडले.

या महिला किंवा मुली पायाळू आहेत. म्हणजे ज्यांचा जन्म पायाकडून झाला असे. असे पायाळू दुर्मिळ म्हणून त्यांचा उपयोग धन शोधण्यासाठी होत असल्याचे तथ्य पुढे आले आहे. अशी मुलगी किंवा स्त्री ही ओळखीतली किंवा नात्यातीलच असते, असं म्हटल्या जाते. पण या पैलूने अधिक तपास शक्य नाही. कारण वन विभाग केवळ प्राण्यांच्याच अंगाने तपास करणार. हे प्रकरण पोलिसांकडे जाईल तेव्हाच स्त्री पैलूने तपास करणे शक्य होईल, अशी बाजू ऐकायला मिळाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी व जादूटोणा निर्मूलन तज्ज्ञ पंकज वंजारे सांगतात. पायाळू मुलींचा उपयोग करण्यात आल्याची आम्ही अनेक प्रकरणे हाताळली आहेत. कुमारी असेल तर त्यांना मांत्रिक कोरा कागज म्हणून संबोधतात. मुलीच्या अंगात सैतान बोलावून पैश्याचा पाऊस पाडण्याच्या भुलथापा दिल्या जातात. तसे बनावट व्हिडिओ तयार करून लोकांना दाखवितात व वाईट कृत्य करण्यास प्रवृत्त करतात. पायाळू मुलगा किंवा मुलीस जमिनीवर चालायला सांगतात. पायाखाली गरम लागल्यास तिथे गुप्तधन असल्याचा बनाव केल्या जातो. प्रसंगी अश्यांचा बळी देखील दिल्या जातो. मुलीस नग्न करीत मांत्रिक फेऱ्या मारायला लावतो. अनेक बिभत्स प्रकार आढळून आले आहेत. करोना काळात हिंगणघाट तालुक्यात मुलीस नग्न करण्याचा व भानामती झाल्याचा प्रकार उजेडात आणला होता. त्यात मुलीचा काकाच सहभागी असल्याचे उघड झाले होते. म्हणून आमचे आवाहन असते की मुलगा किंवा मुलगी पायाळू असल्याचे कधीच कुणास सांगू नका. कारण मोहापोटी जवळचेच लोकं घात करतात. पोलिसांकडे प्रकरण गेले की आम्ही काही बाबी जाणून घेणार, असे पंकज वंजारे म्हणाले.