बुलढाणा: स्पर्धा परीक्षा आणि त्यातही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा म्हणजे उमेदवाराची (विध्यर्थ्याची) कठोर अग्नी परीक्षाच! अनेक वर्षे अभ्यास करीत दरवर्षी लाखो उमेदवार एमपीएससी परीक्षा देतात पण त्यातील मोजक्याच उमेदवारांना यश मिळते. यासाठी ते महानगरात उच्च शिक्षण घेत आणि महागडे खाजगी कोचिंग क्लास लावतात. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एका युवकाने ग्रामीण भागातच शिक्षण घेत आणि कोणताच शिकवणी वर्ग न लावता एमपीएससी चे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलण्याचा पराक्रम केला आहे…
वैभव बबन भुतेकर असे या प्रतिभावान आणि परिश्रमी युवकाचे नाव आहे. बुलढाणा तालुक्यातील पाडळी गावचा वैभव भुतेकर हा भुमिपुत्र आहे. भुतेकर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाव्दारे घेण्यात आलेल्या परिक्षेव्दारे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण वर्ग एक पदी निवड झाली आहे. तो केवळ ही परीक्षा उत्तीर्ण झाला नसून महाराष्ट्र राज्यातून व्दितीय आला आहे. बालपणापासून प्रतिभाशाली आणि महत्वाकांक्षी असलेल्या वैभवने भावी आयुष्यासाठी स्पर्धा परीक्षाचा खडतर मार्ग निवडला.
वैभव भुतेकर यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद हायस्कूल पाडळी ( तालुका व जिल्हा बुलढाणा ) येथे झाले आहे. जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय येथूनच तो चांगल्या गुणांसह बारावी च्या परीक्षेत उत्तीर्ण झाला.गावात पुढील शिक्षणाची सुविधा नसल्याने कला शाखेच्या पदवीचे शिक्षण बुलढाणा येथील विदर्भ महाविद्यालय येथे घेतले. त्यानंतर बुलढाणा येथीलच महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालय येथे समाजकार्य विषयातून (एमएसडब्ल्यू ची) पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.
स्पर्धा परीक्षेची गावातच तयारी
वैभव यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी आपल्या गावातच केली. कुठल्याही प्रकारचे क्लासेस त्यांनी लावले नाही. स्वबळावर नियमित अभ्यास, कठोर सराव, नियोजन या त्री सूत्रीच्या मदतीने आज त्यांनी हे यश संपादन केले आहे. यापूर्वी त्याने स्वबळावर विविध स्पर्धा परीक्षाचा यशस्वी सामना केला. वैभव भुतेकर यांची २०२१ मध्ये कर सहाय्यक पदी निवड झाली होती. त्यानंतर २०२१ मध्ये मंत्रालय लिपिक, अदिवासी आश्रमशाळेवर गृहपाल आणि २०२३ मध्ये त्यांची जालना जिल्ह्यातील वालसा खालसा येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक या पदावर निवड झाली होती. सध्या ते वालसा खालसा येथील शाळेवर कार्यरत आहे.
काल २४ ऑक्टोबर रोजी एमएपएससी चा निकाल लागला. त्यामध्ये त्यांची सहाय्यक आयुक्त (समाजकल्याण) पदी निवड झाली आहे. त्यांचा राज्यातून व्दितीय क्रमांक आला आहे. ते सध्या त्यांच्या पाडळी या गावी आहेत. त्यांच्या निवडी बद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. ते आपल्या यशाचे श्रेय आई वडील व गुरूजनांना देतात.
