अमरावती: खासदार नवनीत राणा यांना गेल्या निवडणुकीच्या वेळी वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला नव्हता, येत्या लोकसभा निवडणुकीतही त्यांना समर्थन देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. वंचित आघाडी त्यांच्या विरोधात निश्चितपणे उमेदवार उभा करेल, अशी घोषणा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र आणि पक्षाचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी येथे केली.
सुजात आंबेडकर म्हणाले, गेल्या निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने नवनीत राणा यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता. आम्ही त्यांना कधीही पाठिंबा दिलेला नाही. वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीची तयारी केली असून अमरावतीतूनही वंचित आघाडी नवनीत राणांच्या विरोधात निवडणूक लढणार आहे.
हेही वाचा… यात्रा काढून भाजपने ओबीसी जनगणनेपासून पळ काढू नये, विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार आक्रमक
कंत्राटी पद्धतीने नोकरभरतीच्या विरोधात युवकांमध्ये प्रचंड रोष असून वंचित आघाडी संपूर्ण राज्यभरात आंदोलन छेडणार असल्याचे सुजात आंबेडकर म्हणाले. विदर्भात आंदोलनाला सुरूवात झाली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तीव्र आंदोलन होत आहे, असे त्यांनी सांगितले