नागपूर : उद्या बुधवारपासून दोन दिवस राज्य सरकारी कर्मचारी संपावर जाणार असल्याने कार्यालयातील कामकाज खोळंबण्याची शक्यता आहे. निवृत्तीच्या वयात वाढ करण्यासह इतरही मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी २३ व २४ फेब्रुवारीला संपूर्ण राज्यातील सरकारी कर्मचारी संपावर जाणार आहेत. नागपुरातही विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी याला पाठिंबा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यात एकूण १७ हजार सरकारी कर्मचारी आहेत, अधिकारी वगळता सर्व कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत. राज्य शासनाने संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेतन कपात करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र संपावर जाण्याची तयारी सरकारी कर्मचारी संघटनांनी केली आहे. याचा परिणाम सरकारी कार्यालयातील कामांवर होणार आहे. अधिकाऱ्यांकडे शिपाई फाईल्स नेऊन देतो, तोही संपात सहभागी आहे. नोटशिट लिहणारे कर्मचारीही संपावर जाणार आहेत. विविध परवानगी अर्ज व तत्सम कामे खोळबंण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठासह इतरही विभागातील कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याने आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास अडचणींना तोड द्यावे लागणार आहे. प्रादेशिक परिवहन (आर.टी.ओ.) विभागाचे शहरात तीन कार्यालये आहेत. त्यात शहर, पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व ग्रामीण प्रादेशिक कार्यालयाचा समावेश आहे. यातील वर्ग तीन व चारचे ७० पेक्षा अधिक कर्मचारी संपावर जाणार असल्याने जुन्या वाहनांची नोंदणी, दंड स्वीकारणे, परवाने नूतनीकरण व तत्सम कामे होणार नाहीत. वस्तू व सेवा कर कार्यालयातील कामांनाही संपाचा फटका बसणार आहे.

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानाभाऊ महल्ले, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गोपीचंद कातुरे, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघाटे केशव शास्त्री, विदर्भ भूमिअभिलेख कर्मचारी संघटने अध्यक्ष दिलीप गर्जे, वस्तू व सेवा कर कर्मचारी संघटनेचे अध्यश्र श्रीकृष्ण झाडमेकर यांनी संप यशस्वी करण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना केले आहे.

संविधान चौकात निदर्शनांची परवानगी नाकारली

संघटनांच्यावतीने बुधवारी संविधान चौकात निदर्शने करण्याची परवानगी पोलिसांकडे मागितली होती. पण कलम १४४ लागू असल्याने ती नाकारण्यात आली. त्यामुळे विविध कार्यालयापुढे कर्मचारी निदर्शने करतील असे, संघटनेच्यावतीने सांगण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Various trade organizations support government employees strike zws
First published on: 23-02-2022 at 01:32 IST