क्षेत्रिय समतोल साधण्याचा प्रयत्न

नागपूर : शिवेसना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कोटय़ातून विदर्भाला प्रत्येकी दोन ते तीन मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी दावेदार अनेक आहेत. आघाडीतील तीनही पक्ष मंत्रिमंडळात क्षेत्रिय समतोल साधण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे अनेक दावेदारांचा हिरमोड होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

काँग्रेसने निडणुकीत विदर्भात जोरदार मुसंडी मारली आहे. १५ आमदार निवडून आले आहेत. काँग्रेसने विदर्भाला साथ दिली आहे. त्यामुळे येथे किमान तीन ते चार कॅबिनेट मंत्री देऊन पक्ष बळकट केला जाईल, असे स्थानिक काँग्रेसजणांचे म्हणणे आहे. उत्तर नागपुरातील डॉ. नितीन राऊत हे मंत्रिपदाच्या शर्यतीत प्रमुख दावेदार आहेत.  चंद्रपूर जिल्ह्य़ातील ब्रम्हपुरीचे आमदार आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचेही नाव पुढे आहे. यासोबच पश्चिम विदर्भातून तिवशाच्या आमदार यशोमती ठाकूर यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करून काँग्रेसवासी झालेले नाना पटोले हे सुद्धा मंत्रिपदाचे दावेदार आहेत. ते प्रतिकूल परिस्थितीवर मात करून साकोली येथून विजयी झाले आहेत. त्यांना मंत्रिपद मिळते की पक्ष संघटनेत मानाचे पद मिळते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादीचे अर्धा डझनभर आमदार विदर्भात आहेत. हा पक्ष देखील पक्षवाढीसाठी विदर्भात मंत्रिपद देण्याची शक्यता आहे. काटोलचे आमदार अनिल देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश निश्चित मानला जात आहे. तसेच पश्चिम विदर्भातून सिंदखेड राजा विधानसभा मतदान क्षेत्राचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांचाही समावेश असण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे चार आमदार आहेत. त्यांचे दोन बंडखोरही निवडून आले आहेत. शिवसेनेचा स्वतंत्र विदर्भाला विरोध आहे. त्यामुळे येथे किमान दोन मंत्रीपद देऊन शिवसेनेचे प्रतिनिधित्व वाढवण्याची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्य़ातील दिग्रसचे आमदार  संजय राठोड यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.  रामटेकमधील बंडखोर अ‍ॅड. आशीष जयस्वाल यांच्याही नावाची जोरदार चर्चा आहे.

हे आहेत मंत्रिपदाचे दावेदार

राष्ट्रवादीच्या कोटय़ातून अनिल देशमुख (काटोल) आणि डॉ. राजेंद्र शिंगणे (सिंदखेड राजा) असण्याची शक्यता आहे.  काँग्रेसच्या कोटय़ातून विजय वडेट्टीवार (ब्रम्हपुरी), डॉ. नितीन राऊत (उत्तर नागपूर), यशोमती ठाकूर (तिवसा), नाना पटोले (साकोली), सुनील केदार (सावनेर) हे दावेदार आहेत. शिवसेनेच्या कोटय़ातून संजय राठोड (दिग्रस), अ‍ॅड. आशीष जयस्वाल (रामटेक) यांची नावे आघाडीवर आहेत.

मावळत्या सरकारमध्ये विदर्भाला झुकते माप

मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भाचे असल्याने त्यांच्या मंत्रिमंडळात विदर्भाला झुकते माप मिळाले होते. मुख्यमंत्री पदासह आठ मंत्री विदर्भाचे होते. जवळपास सर्वच महत्त्वाची खाते विदर्भाच्या मंत्र्यांकडे होती.