अकोला : एचपी कंपनीचे सिलिंडर वाहून नेणारा ट्रक उतावळी नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार वाशीम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील पिंप्री सरहद येथे घडला. या घटनेमध्ये ट्रक चालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. वाशीम जिल्ह्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून काच, उतावळी आदी नद्यांना पूर आला आहे. या पुरामुळे शेकडो हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले. अनेक मार्ग बंद झाले होते.
वाशीम जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात जोरदार पाऊस कोसळला आहे. या पावसामुळे सर्वत्र जलमय वातावरण झाले. मुसळधार पावसामुळे पिंपरी सरहद येथील काच व उतावळी या दोन्ही नद्यांनी रौद्ररूप धारण केले. दोन्ही नद्यांना पूर आल्यामुळे महामार्ग हा बंद पडला होता. दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, एचपी कंपनीचे सिलिंडर वाहून नेणारा ट्रक मेहकरकडून मालेगावकडे जात होता. नदीला पूर आला असतांना ही चालकाने ट्रक पुलावरून नेला. पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे ट्रक अक्षरश: वाहून गेला. पुढे नदीमध्ये जाऊन ट्रक पाण्यात कोसळला. ट्रकचे कॅबिन पुराच्या पाण्याने पूर्ण भरले.
त्या पाण्यात बुडून ट्रक चालकाचा मृत्यू झाला. शे. हुसेन शे. गुलाब रा. चिखलठाणा, छत्रपती संभाजीनगर असे मृतक ट्रक चालकाचे नाव आहे. बुधवारी ट्रक चालकाचा मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपाासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. दरम्यान, पावसाचा जोर कमी झाल्याने पुलावरील पाणी ओसरले आहे. वाहतूक पूर्ववत झाली आहे.
वाशीम जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आले. पुराचे पाणी शेतामध्ये शिरुन जमीन खरडून गेली आहे. पिंप्री सहहद परिसरात उतावळी नदीच्या पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांसमोर दुबार, तिबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. वाशीम जिल्ह्यात दोन दिवसांत रिसोड तालुक्यामध्ये सर्वाधिक पाऊस झाला.
जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये सरासरी २५.५ मि. मी. पावसाची नोंद झाली. रिसोड तालुक्यात काल ५१ मि. मी., तर आज ५५.४ मि. मी. पाऊस कोसळला आहे. त्या खालोखाल मंगरुळपीर तालुक्यात काल ३८.१, तर आज ४३.७ मि.मी. पाऊस पडला. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्याच्या सिंचन प्रकल्पात देखील मोठी वाढ झाली आहे. वाशीम जिल्ह्यात बुधवारी दुपारनंतर पावसाने उसंत घेतली.