बहुरंगी लढतीत हलबा, मुस्लीम मतांचे विभाजन अटळ
हलबा आणि मुस्लीमबहुल मध्य नागपूर मतदारसंघात या दोन्ही समाजांचे एकापेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असल्याने मतांचे विभाजन अटळ आहे. ते कोणाच्या पथ्यावर पडते, यावरच येथील जय-पराजयाचे समीकरण अवलंबून असणार आहे.
या मतदारसंघात १३ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने विद्यमान आमदार विकास कुंभारे तिसऱ्यांदा उभे केले आहे. काँग्रेसने यावेळी बंटी शेळके यांच्या रूपात तरुण व नवीन चेहरा दिला आहे. याशिवाय बसपाचे धर्मेद्र मंडलिक, वंचितचे कमलेश भगतकर आणि एमआयएमकडून अब्दुल शारिक पटेल रिंगणात आहेत.
मध्य नागपुरात ७० ते ७५ हजार हलबा, तेवढेच मुस्लीम आणि ४० हजार हिंदी भाषिक तर सव्वा लाखांच्या घरात इतर समाजाचे मतदार आहेत. या मतदारसंघात जातीय समिकरणे नेहमीच निर्णायक ठरत आली आहेत. मुस्लिमांची बहुसंख्य मते आणि पारंपरिक काँग्रेसची मते या आधारावर या पक्षाचे अनिस अहमद १९९४ ते २००४ असे सलग तीन वेळा येथून विजयी झाले होते. मात्र त्यानंतर मतदारसंघाची पुनर्रचना झाल्याने काही मुस्लीम बहुल वस्त्या पश्चिममध्ये गेल्या तर काही इतर मतदारसंघातील वस्त्या त्यात समाविष्ट झाल्या. त्यामुळे या मतदारसंघावरील मुस्लिमांची पकड कमी झाली. त्यामुळेच २००९ मध्ये विकास कुंभारे यांनी अनिस अहमद यांचा पराभव करून प्रथम ही जागा भाजपला मिळवून दिली. त्यानंतर २०१४ मध्येही त्यांनी ही जागा राखली. या मतदारसंघात जात प्रमाणपत्राच्या मुद्यावरून हलबांची नाराजी काँग्रेसला भोवली व हा समाज या पक्षावर नाराज झाला.
२०१४ मध्ये भाजपने सत्तेवर येऊनही आरक्षणाचे आश्?वासन न पाळल्याने समाज सरकार विरुद्ध रस्त्यावर उतरला होता. त्याचे नेतृत्व खुद्द आमदार कुंभारे यांनी केले होते. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपला मिळालेली आघाडी हलबा भाजपवर नाराज नाही हे दर्शवणारी ठरली. याचा फायदा यावेळी कुंभारे यांना होऊ शकतो. तसेच. दोन मुस्लीम मतांचे विभाजन त्यांच्या पथ्यावर पडणारे आहे. मात्र चार उमेदवार उभे असल्याने हलबा मतांचे विभाजन, पक्षातूनच कुंभारे यांना तिकीट वाटपाच्या वेळी झालेला विरोध आणि आमदार म्हणून असलेली निष्क्रिय कामगिरी या बाबी त्यांच्या विरोधात जाणाऱ्या आहेत.
दुसरीकडे काँग्रेसने बंटी शेळके यांच्या रूपात तरुण व तडफदार नवीन चेहरा दिला आहे. त्यांनी आपल्या वेगवेगळ्या आंदोलनामुळे अल्पकाळात नागपूरच्या राजकारणात स्वक र्तृत्वावर ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या पाठीशी असलेली तरुणांची फळी ही त्यांची जमेची बाजू आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपला मताधिक्य मिळाले असले तरी त्यात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत झालेली घट काँग्रेससाठी आशेची किरण ठरणारी आहे. याशिवाय मुस्लीम मतदार, काँग्रेसची पारंपरिक मते या त्यांच्या जमेच्या बाजू आहे, तर एमआयएमसह दोन मुस्लीम उमेदवारांमुळे मुस्लिमांच्या मतांमध्ये होणारी विभागणी, पक्षांतर्गत गटबाजी या बाबी शेळके यांच्यासाठी अडचणीच्या ठरणाऱ्या आहेत.
वंचितचे उमेदवार कमलेश भगतकर यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली होती. याशिवाय हलबा समाजाच्या नंदा बोकडे, भोजराम निमजे हेही रिंगणात आहेत. बसपचे धर्मेद्र मंडलिक यांचा दलित मतांवर दावा आहे.