सतीश होले भाजपमधून निलंबित; कुमेरियांबाबत सेनेच्या भूमिकेकडे लक्ष

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर व उपराजधानी नागपुरात भाजप-सेना युतीत तणाव निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांचे कट्टर समर्थक उमेदवार रिंगणात असलेल्या दक्षिण नागपुरात सेनेने केलेली बंडखोरी ही बाब यासाठी कारणीभूत ठरली आहे. युतीच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंड करणाऱ्यांवर पक्षाने कारवाई करावी, या धोरणानुसार भाजपने या मतदारसंघातील पक्षाचे बंडखोर सतीश होले यांना निलंबित केले. मात्र शिवसेनेने त्यांचे बंडखोर किशोर कुमेरिया यांच्याबाबत मात्र अद्याप भूमिका स्पष्ट केली नाही. उलट गुरूवारी सेनेने या मतदारसंघात मेळावा घेऊन भाजपपुढे आव्हान उभे केले आहे.

दक्षिण नागपूरची जागा भाजपकडे असून येथे पक्षाचे मोहन मते अधिकृत उमेदवार आहेत. त्यांच्या विरुद्ध  भाजप नगरसेवक  सतीश होले यांनी बंड केले आहे. शनिवारी या मतदारसंघात मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा होणार आहे. त्यापूर्वी पक्षाने सतीश होले यांना पक्षातून निलंबित केले.याच मतदारसंघात सेनेचे नगरसेवक किशोर कुमेरिया यांनीही भाजपविरुद्ध बंड केले आहे. ‘हीच ती वेळ’ असा नारा देत शिवसेनेने कुमेरिया यांच्या प्रचारार्थ गुरुवारी शिवसैनिकांचा मेळावा घेतला. त्यात सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भाजपच्या नेत्यांवर टीका करण्यात आली. त्यामुळे कुमेरियांच्या बंडाला पक्षाचे समर्थन असल्याचा संदेश शिवसैनिकांमध्ये गेला. परिणामी, अनेक शिवसैनिकांनी भाजपच्या प्रचारापासून स्वत:ला दूर ठेवले आहे. भाजपने त्यांच्या बंडखोरांवर कारवाई केल्यामुळे सेनेवरही दबाव वाढला आहे. मेळाव्याची माहिती भाजपने सेनेतील वरिष्ठांना  दिली. संपर्क प्रमुखांच्या माध्यमातून माहिती घेऊन पक्ष प्रमुख याबाबत निर्णय घेतील असे सेनेकडून भाजपला कळवण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, शिवसेनेचे विदर्भाचे संपर्क प्रमुख गजानन कीर्तीकर यांच्याकडे याबाबत तक्रार केल्यानंतर दक्षिण नागपूरचे संपर्क प्रमुख दीपक सुर्वे आज नागपुरात आले. त्यांनी मेळाव्यात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव, शहर अध्यक्ष मंगेश कढव, राजू तुमसरे, अजय दलाल, किशोर पराते, बंडू तागडे, अलका दलाल, प्रवीण जुमडे, किशोर ठाकरे, युवा सेना जिल्हा प्रमुख विक्रम राठोड आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे या कुमेरिया यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे आता लक्ष लागले आहे. होले आणि कुमेरिया या दोन्ही बंडखोरांचा सर्वाधिक फटका  भाजपला बसण्याची शक्यता आहे. होले हे प्रभाग क्र. ५९ (अ) रघुजीनगर प्रभागाचे तर कुमेरिया हे प्रभाग ४६ (अ) रमणा मारोती भागाचे नगरसेवक असून दोघेही माजी उपमहापौर आहेत.

उपेंद्र शेंडे, नागुलवार भाजपमध्ये जाणार

रिपाइं नेते व उत्तर नागपूरचे माजी आमदार उपेंद्र शेंडे आणि राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजू नागुलवार भाजपमध्ये  प्रवेश करणार आहेत. शेंडे यांच्या पक्षप्रवेशाची अधिकृत घोषणा शनिवारी होणार आहे तर नागुलवार हे मुख्यमंत्र्यांच्या सभेत प्रवेश करणार आहेत. नागुलवार दक्षिणमधून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र ही जागा काँग्रेसला सुटल्याने त्यांच्या पदरी निराशा आली. त्यामुळे त्यांनी भाजपचे उमेदवार मोहन मते यांना पाठिंबा देत त्यांचा प्रचारही सुरू केला आहे. मी पक्षाचा राजीनामा दिला असून मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेत भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, असे नागुलवार यांनी सांगितले.

‘‘स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याचा अहवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला जाईल. याबाबतच अंतिम निर्णय तेच घेतील.’’ – दीपक  सुर्वे, संपर्क प्रमुख दक्षिण नागपूर .