अपेक्षित आघाडी मिळवण्यात मात्र अपयश

पूर्व नागपुरात पहिल्या फेरीपासून भाजपचे कृष्णा खोपडे यांनी काँग्रेसचे पुरुषोत्तम हजारे यांचा २४ हजार १७ मतांनी पराभव केला. मात्र त्यांना अपेक्षित आघाडी मिळाली  नाही. यावेळी सतरावी फेरी जाहीर होताच ‘वारे कमळ आ गया कमळ’च्या घोषणा देत भाजपच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राच्या बाहेर जल्लोष केला. गेल्या निवडणुकीत खोपडे यांना ४८ हजारांची आघाडी असताना आणि लोकसभा निवडणुकीत ७४ हजाराची आघाडी असताना खोपडे यांची या निवडणुकीत आघाडी मात्र कमी झाली.

पूर्वी काँग्रेसचा गड असलेल्या पूर्व नागपुरात २००९ व २०१४ मध्ये भाजपकडे असलेल्या या मतदारसंघात तिसऱ्यांदा कृष्णा खोपडे यांनी आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला. गुरुवारी सकाळी ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या सभागृहात मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर टपाल मतदानापासून १७ व्या फेरी अखेपर्यंत खोपडे यांनी आघाडी घेतली. काँग्रेसचे पुरुषोत्तम हजारे यांनी त्यांना चांगलीच लढत देत मताधिक्य मिळवले. २०१४ मध्ये खोपडे यांना ९९ हजार १३६ मते मिळाली होती. काँग्रेसचे अभिजित वंजारी यांना ५० हजार ५२२ मते मिळाली होती. मात्र त्या तुलनेत दोनवेळा नगरसेवक म्हणून राहिलेले आणि मतदारसंघातील अनेक भागात नवखे असलेले हजारे यांनी ७७ मते घेतली.

पहिल्या फेरीत खोपडे यांनी ३ हजार ४८९ मतांनी आघाडी घेतली. त्यानंतर बाराव्या फेरी अखेर आघाडी कायम ठेवली होती. मात्र तेराव्या फेरीत १ हजाराने आघाडी कमी झाली होती. पंधराव्या फेरीत खोपडे यांना ९० हजार ३७१ तर पुरुषोत्तम हजारे यांना ७० हजार १६९ मते मिळाली होती. खोपडे यांना सतराव्या फेरीत १ लाख ३ हजार ९५२ तर हजारे यांना ७९ हजार ९७५ मते मिळाली होती. भाजप व काँग्रेसशिवाय बसपाचे सागर लोखंडे यांना ५ हजार २८४ मते तर वंचित आघाडीचे मंगळमूर्ती सोनकुसरे यांना ४ हजार ३३८ मते मिळाली.

या मतदारसंघात बसपा व वंचित आघाडीचे उमेदवार १५ ते २० हजारच्या जवळपास मते घेतील अशी अपेक्षा होती. मात्र दोन्ही उमेदवार मिळून १० हजाराचा आकडा गाठू शकले नाही. मात्र त्या तुलनेत पुरुषोत्तम हजारे यांना मात्र चांगले मताधिक्य मिळाले. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत मतदारसंघात नितीन गडकरी यांना १ लाख ३५ हजार ४५१ मते मिळाली होती, तर ६० हजार ७१ मते पटोले यांना मिळाली होती मात्र हजारे यांना पटोलेपेक्षा जास्त मते मिळाली हे विशेष.

खोपडे यांचा विजय घोषित केल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हनुमाननगर क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयासमोर गुलाल उधळून, ढोलताशांच्या निनादात फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावेळी नोटाला अधिक मतदान झाले आहे. २०१४ मध्ये १ हजार ५१ नोटा मते असताना यावेळी ३ हजार २८६ मतदारांनी नोटाचा उपयोग करून मतदान केले.

मताधिक्य कमी झाल्याची कारणे शोधू

विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत ४८ हजार मतांनी विजयी झालो असताना यावेळी त्यापेक्षा जास्त मतांनी आघाडी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र यावेळी मताधिक्य कमी का झाले असून त्याची कारणे शोधून पुढील पाच वर्षांत जनतेच्या समस्या आणि विकास कामांकडे लक्ष दिले जाईल. पूर्व नागपुरात पूर्वी कुठलाच विकास झाला नाही मात्र, गेल्या दहा वर्षांत अनधिकृत वस्त्यांमध्ये विकासाची कामे केली. अनेक विकासकामे केली आहेत मात्र ती कामे जनतेपर्यंत पोहचवण्यात आम्ही कमी पडलो आहे. स्मार्ट सिटीचा कुठलाही फटका बसला नाही. तेथील लोकांची नाराजी नव्हती.

  •      कृष्णा खोपडे (भाजप) – १ लाख ३ हजार ९५२
  •     पुरुषोत्तम हजारे (काँग्रेस) – ७९ हजार ९७५
  •      सागर लोखंडे (बसपा) –  ५हजार २८४
  •   मंगळमूर्ती सोनकुसरे (वंचित आघाडी) – ४ हजार ३३८

मतदारसंघात भाजपच्या विरोधात नाराजी होती. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात मते मिळाली आहे. मात्र विजयी होऊ शकलो नाही. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी भरपूर परिश्रम  घेतले आहे. कुठे मते कमी पडली आणि कुठे जास्त मते पडली याचा शोध घेऊन मतदारसंघात पाच वर्षे काम करणार आहे. – पुरुषोत्तम हजारे, काँग्रेस उमेदवार.